…आज कळले ‘बायपास’चे महत्त्व; राजगुरुनगरकरांनी घेतला काही काळ मोकळा श्वास

…आज कळले ‘बायपास’चे महत्त्व; राजगुरुनगरकरांनी घेतला काही काळ मोकळा श्वास
Published on
Updated on

राजगुरुनगर; पुढारी वृत्तसेवा: प्रदीर्घ काळ रेंगाळत काम सुरू असलेला राजगुरुनगर बाह्यवळण मार्ग किती महत्त्वाचा आहे, हे बुधवारी सर्व सरकारी यंत्रणांना कळले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजगुरुनगर दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर काही काळ पुणे- नाशिक महामार्गावरील सर्व वाहतूक नव्याने तयार होत असलेल्या राजगुरुनगर बायपास मार्गे वळविण्यात आल्याने 'व्हीआयपी' दौरा असताना कोणतीही वाहतूक कोंडी न होता राजगुरुनगरकरांनी प्रथमच मोकळा श्वास घेतला.

गेली अनेक वर्षांपासून राजगुरुनगर आणि वाहतूक कोंडी एक समीकरणच होऊन बसले आहे. त्यातही काही कार्यक्रम, सलग सुट्या आल्या, व्हीआयपी दौरे असतील तर नाशिक, पुण्याकडून येणारे प्रवासी हमखास तीन-चार तास वाहतूक कोंडीत अडकणार म्हणजे अडकणारच. पुणे-नाशिक महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीत अडकला आहे. यामध्ये या मार्गावरील प्रमुख चाकण, राजगुरुनगर, कळंब, मंचर, नारायणगाव या काही शहरांमध्ये महामार्गावरील वाहने आणि स्थानिक वाहतूक यामुळे नियमित प्रचंड वाहतूक कोंडी होते.

या रस्त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले. यामध्ये वरील सर्व प्रमुख शहरांतून बायपास काढण्यात आले. परंतु ही सर्व कामे प्रचंड संथगतीने सुरू आहेत. नारायणगाव बायपासचे काम पूर्ण होऊन हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केल्याने नारायणगाव शहरातील वाहतूक कोंडी दूर झाली आहे. परंतु आजही मंचर, कळंब, राजगुरुनगर, चाकण आणि आता नव्याने आळंदी फाटा, मोशी आदी सर्वच ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी बायपासचे काम सुरू असून, हे काम येत्या काही महिन्यांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

परंतु हे बायपास सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडीतून मंचर, कळंब, राजगुरुनगर शहरांची सुटका होणार याची झलक बुधवारी राजगुरुनगरकरांनी अनुभवली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हुतात्मा शिवराम हरि राजगुरू यांच्या 114 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बुधवार (दि. 24) राजगुरुनगर शहराच्या दौ-यावर आले होते. यामुळे पोलिस व स्थानिक प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. शहरामध्ये होणा-या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर सूक्ष्म नियोजन केल्याने व्हीआयपी दौरा असूनही राजगुरुनगर शहराची मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून सुटका झाली. आता हा बायपास मार्ग त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

पूर्वनियोजन करत वाहतूक बायपास मार्गे वळवली
राज्यपालांच्या राजगुरुनगर दौर्‍यासाठी आठ दिवसांपासून नियोजन सुरू होते. राजगुरुनगर शहरातील मुख्य पुणे- नाशिक महामार्गावरच राज्यपाल महोदयांचा वाहनांचा ताफा जाणार होता. दोन्ही बाजूने वाहतूक सुरू ठेवली असती तर प्रचंड वाहतूक कोंडी होऊन सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असता. दौरा पूर्ण होईपर्यंत वाहतूक बंद ठेवणेदेखील अशक्य होते. यामुळेच राष्ट्रीय महामार्ग विभागाशी चर्चा करून राजगुरुनगर बायपासच्या सर्व्हीस रोडवर मुरूम टाकून तात्पुरता रस्ता सुरू केला व काही काळासाठी मुख्य रस्त्यावरील सर्व वाहतूक बायपास मार्ग वळविण्यात आली. यामुळेच बुधवारी शहरात वाहतूक कोंडी झाली नाही.
                                                        – सतीशकुमार गुरव, पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news