पुणे : बारामतीत डेंग्यू, स्वाईन फ्लूचा धोका वाढतोय | पुढारी

पुणे : बारामतीत डेंग्यू, स्वाईन फ्लूचा धोका वाढतोय

बारामती, पुढारी वृत्तसेवा : बारामती शहरात डेंग्यू, स्वाईन फ्लूचा धोका वाढतो आहे. शहरातील एका महिलेचा पुण्यात उपचारांदरम्यान ऑगस्टच्या सुरुवातीला मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने मात्र या घटनेची पुण्यात नोंद झाली असून, आमच्याकडे माहिती नव्हती, असे म्हणत हा प्रकार बाहेर येऊ दिलेला नाही.

शहरातील अशोकनगर भागातील पन्नासवर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पंधरा दिवस उलटूनही प्रशासनाने ही माहिती अंधारात का ठेवली, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

अशोकनगर येथे राहणार्‍या महिलेला 25 जुलैपासून सर्दी ,पडसे, खोकला, अंगदुखी याचा त्रास सुरू होता. यासंदर्भात महिलेने बारामती शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन विविध तपासण्या देखील केल्या होत्या. त्यानंतर तिचा श्वसनाचा त्रास बळावल्याने पुढील उपचारांसाठी तिला पुण्याला नेण्यात आले. तेथे 3 ऑगस्ट रोजी त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 5 ऑगस्ट रोजी त्यांचा उपचारांदरम्यान पुण्यात मृत्यू झाला.

संबंधित महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला, ही बाब खरी आहे. लक्षणे जाणवण्यापूर्वी त्या महाबळेश्वर व अन्य ठिकाणी गेल्या होत्या. त्यामुळे तिकडेच त्यांना संसर्ग झाला असावा, अशी शक्यता आहे. बारामतीत सध्या कोणीही संशयित रुग्ण नाही. तरीही नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

                                           – डॉ. सदानंद काळे, वैद्यकीय अधीक्षक, बारामती

शहरात डेंग्यू व अन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी नागरिकांनी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा. या एका दिवशी पाणीसाठ्याची ठिकाणे स्वच्छ करून घ्यावीत. फि—जमधील पाणी, जुने टायर्स, टाकीतील पाणी बदलावे. परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. नगरपरिषदेकडून फवारणीसह अन्य उपाययोजना केल्या जात आहेत.

                                            – महेश रोकडे, मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद

Back to top button