पिंपरी : लग्नाच्या आमिषाने समुपदेशक महिलेची फसवणूक

पिंपरी : लग्नाच्या आमिषाने समुपदेशक महिलेची फसवणूक
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : समुपदेशक महिलेला मॅट्रिमोनियल वेबसाईटवरून संपर्क करून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी तिच्याकडून 12 लाख 29 हजार रुपये उकळले. हा प्रकार वाकड येथे उघडकीस आला असून पोलिसांनी आरोपी महिलेला दिल्ली येथून अटक केली आहे. बियू न्यामाम्बेलो ऑक्ट्वी (28, सध्या रा. बंगळूर, मूळ रा. कांगो) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. महिलेचा आणखी एक साथीदार फरार आहे. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला 'पीएचडी'धारक असून लहान मुलांसाठी समुपदेशक म्हणून करतात. दरम्यान, आरोपींनी मॅट्रिमोनियल या डेटिंग अ‍ॅपवरून महिलेशी संपर्क केला. आपण 'युएसए'मध्ये कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर असल्याचे आरोपीने फिर्यादी यांना सांगितले.

तसेच, लग्न करण्याचे व भारतात येऊन स्थायिक होण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, आरोपीची आई आजारी असून, उपचारासाठी बंगळूर येथील बियांचे औषधे पाठविण्यासाठी तसेच या औषधी बियांच्या व्यवसायाकरीता आणि बनावट बिया विकत घेण्यास आरोपीने फिर्यादीला भाग पाडले. त्या बिया विकत घेण्यासाठी 'यूएस'मधील कंपनीच्या पर्चेस मॅनेजरसह भारतात येत असल्याचे आरोपीने सांगितले. पासपोर्टवर ग्रीन कार्ड नसल्याने भारतात एअरपोर्टवर पकडले असून, त्याच्याकडील डॉलर कस्टम अधिकारी यांनी पकडले आहे, असे आरोपीने फिर्यादी यांना सांगितले. तेथून सोडवून घेण्यासाठी तसेच आजारी असल्याचे सांगून अशा वेगवेगळ्या कारणांसाठी आरोपीने फिर्यादी यांची 12 लाख 29 हजार 400 रुपयांना फसवणूक केली.

दरम्यान, या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करीत असताना आरोपी हे बंगळूर येथून गुन्हा करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, वाकड पोलिसांनी जानेवारी 2022 मध्ये बंगळूर येथे जाऊन तपास करून आरोपी निष्पन्न केले होते. त्यावेळी आरोपी महिला तेथून महिन्यापूर्वीच परदेशात निघून गेली असल्याची व तिच्याबरोबर राहणारा तिचा साथीदार तेथेच राहत असल्याची माहिती मिळाली. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला होता. आरोपी महिलेच्या पासपोर्टवरून तिची 'एलओसी' केली होती. त्याप्रमाणे आरोपी महिलेला दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतले होते. त्यानंतर आरोपी महिलेला वाकड पोलिसांनी 19 ऑगस्ट 2022 रोजी दिल्ली येथून अटक केली. ही कामगिरी उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले, वाकडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक एस. एम. पाटील, संभाजी जाधव, पोलिस कर्मचारी दीपक भोसले यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news