भूकरमापक पाच हजाराची लाच घेताना अडकला जाळ्यात - पुढारी

भूकरमापक पाच हजाराची लाच घेताना अडकला जाळ्यात

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शिरुर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका भूकरमापक कर्मचार्‍याला जमीनीची मोजणी करून देण्याच्या मोबदल्यात पाच हजाराची लाच स्वीकारताना लाचलुपत विभागाच्या पथकाने पकडले. प्रशांत मोहन कांबळे ( भूकरमापक वर्ग-३ ) असे लाचखोर कर्मचार्‍याचे नाव आहे. कार्यालयाच्या आवारात पथकाने ही कारवाई केली आहे.

याप्रकरणी कांबळे याच्या विरुद्ध लाचलुपत प्रतिबंधक कायद्यानुसार शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ५३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांनी त्यांच्या जमीनीची मोजणी करण्यासाठी शिरुर येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी आरोपी प्रशांत कांबळे याने त्यांच्याकडे जमीन मोजणी करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची मोबदला म्हणून मागणी केली. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचत विभागाकडे तक्रार केली होती.

प्राप्त तक्रारीची सोमवारी ( दि.३० ) खातरजमा केली असता, कांबळे याने लाच मागितल्याचे समोर आले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सोमवारीच कार्यालयाच्या आवारात सापळा लावला होता. त्यावेळी पाच हजाराची लाच घेताना कांबळेला पथकाने पकडले. एकाच दिवसात एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक भारत साळुंखे करीत आहेत.

हेही वाचले का?

Back to top button