पुणे : बनावट ‘आयटीआर’ अन् जीएसटीही, चौघांविरुद्ध गुन्हा | पुढारी

पुणे : बनावट ‘आयटीआर’ अन् जीएसटीही, चौघांविरुद्ध गुन्हा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील एका निवृत्त महिला आयएएस अधिकारी तथा माजी अतिरिक्त सचिव यांच्या मुलाच्या नावाने बनावट व खोटे आयटीआर व जीएसटी भरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलाच्या पॅनकार्डचा वापर करून हा आयटीआर भरला गेला आहे. मुलाचे करपात्र उत्पन्न नसतानाही त्यांना आयकर परतावा भरण्याची जबाबदारी निर्माण करून स्वतः आयकर विभागाच्या रडारवर न येता शासन व आयकर विभागाची फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी 72 वर्षीय निवृत्त महिला अधिकार्‍यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून चार अनोळखी व्यक्तींवर आयकर विभागाची, तसेच महिलेच्या मुलाची फसवणूक केल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार 2011 ते 2022 या कालावधीत घडला. तब्बल 11 वर्षांपासून त्यांच्या मुलाच्या नावाने आयकर भरणा होत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माजी आयएएस अधिकारी असून, त्या पौड रोड परिसरात राहण्यास आहेत. त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त परदेशात असतो. त्यांच्या मुलाला आयकरचा भरणा करायचा होता.

या निमित्ताने त्यांनी माहिती घेण्यास सुरुवात केली. आयकर विभागात जाऊन त्याची माहिती घेत रिटर्न भरण्याबाबत संबंधितांना विचारपूस केली. या वेळी संबंधित विभागाने त्यांना मुलाच्या नावाने 2011 पासून आयटीआर भरणा केलेला आहे; पण व्हेरिफिकेशन केलेले नसल्याचे सांगण्यात आले. परंतु, त्यांनी आयकरचा भरणा केलेलाच नव्हता. ते प्रथमच आयकर भरण्याबाबत माहिती घेत होते. त्यामुळे त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी चौकशी केली असता त्यांना त्यांच्या मुलाचा पॅनकार्डचा वापर करून बनावट व खोटा आयटीआर भरल्याचे समजले.

त्यांच्या मुलाच्या नावाने गेली 11 वर्षे हा भरणा केला जात होता. त्यांचा मुलगा कर भरण्यास करपात्र नसतानाही त्याच्या नावाने कर भरला गेला आहे. या मुलाच्या नावाने जीएसटीदेखील भरला गेला आहे. ज्या व्यक्तींनी कंपनीच्या नावाने जीएसटी भरला, त्या कंपनीची उलाढाल कोट्यवधींची दाखविण्यात आली आहे, तर कर भरला त्या खात्याचीदेखील लाखोंमध्ये उलाढाल दाखविली गेली आहे. हे कोणी केले व का हे मात्र समजू शकलेले नाही. तो कोणी भरला व त्याचे कारण काय, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. हा प्रकार समोर आल्यानंतर निवृत्त महिला अधिकार्‍यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार पोलिसांनी चौकशीअंती हा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हाके पुढील तपास करत आहेत.

Back to top button