पिंपरी : सायबर चोरट्यांचा पोलिस अधिकार्‍यांशी पंगा; पोलिसांच्या नावे पैसे मागण्याचा सपाटा सुरूच | पुढारी

पिंपरी : सायबर चोरट्यांचा पोलिस अधिकार्‍यांशी पंगा; पोलिसांच्या नावे पैसे मागण्याचा सपाटा सुरूच

संतोष शिंदे

पिंपरी : पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावे बनावट फेसबुक खाते तयार करून सायबर चोरट्याने पैशांची मागणी केली होती. त्यानंतर, आता सध्याचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांचे नाव वापरून देखील पैसे उकळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यानच्या काळात आयुक्तालयातील डझनभर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचे फेसबुकवर बनावट खाते तयार केल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे. त्यामुळे चोरट्यांना पोलिसांचीदेखील भीती नसल्याचे अधोरेखित झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ऑक्टोबर 2020 मध्ये पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते तयार करून पैशांची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी कृष्ण प्रकाश यांनी स्वतः समोर येऊन ट्विटरद्वारे माहिती दिली. सायबर चोरट्यांनी ‘घीळीहपर र्चीालरळ’ या नावाने बनावट खाते तयार केले होते. त्यासाठी कृष्ण प्रकाश यांचे फोटो देखील वापरण्यात आले. त्यानंतर चोरट्यांनी कृष्ण प्रकाश यांच्या फेसबुक फ्रेंडला मेसेज करून पेटीएमद्वारे दहा हजारांची आर्थिक मदत मागितली. मात्र, संबंधित मित्राने कृष्ण प्रकाश यांच्याशी संपर्क केल्याने ही बाब उघडकीस आली. सदर प्रकरणात पोलिस आरोपींपर्यंत पोहचू शकले नाही.

दरम्यान, सायबर चोरट्यांनी नुकतेच पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या नावे एसीपींना मेसेज केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी 18 ऑगस्ट रोजी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने त्याच्या मोबाईलच्या व्हाटसअप प्रोफाईलवर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांचा फोटो आणि त्यांचे नाव वापरले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वेबसाईटवरून शहर पोलिस दलातील पोलिस अधिकार्‍यांचे संपर्क क्रमांक घेऊन त्यावरून काही पोलिस अधिकार्‍यांना पोलिस आयुक्तांच्या नावाने मेसेज केला.

आरोपी हा पोलिस आयुक्त असल्याचे भासवून पैसे मागण्याच्या उद्देशाने अधिकार्‍यांना मेसेज करीत असल्याचे निदर्शनास आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरणात आरोपी निष्पन्न झाला असून, गुन्हे शाखेचे पथक रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या व्यतिरिक्त पोलिस आयुक्तालयातील सहायक आयुक्त, उपायुक्त आशा अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांना देखील सायबर चोरट्यांनी टार्गेट केले आहे. मात्र, तरी देखील आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्याने त्यांचे धाडस वाढल्याचे बोलले जात आहे.

  • तुमच्या नावे पैसे मागितले; मग हे करा…
  • सुरुवातीला ज्यांच्या नावाचे बनावट फेसबुक खाते बनवले आहे. त्यांनी स्वतःच्या फेसबुक खात्यावरून बनावट खाते शोधा. जर स्वतःला शोधता येत नसेल तर ज्या मित्रांना त्या प्रोफाईलवरून रिक्वेस्ट गेली आहे, त्यांच्याकडून सदर बनावट खात्याची लिंक मागवून घ्या.
  • बनावट खात्यावर गेल्यानंतर उजव्या बाजूला तीन डॉट दिसतील. त्या डॉटवर क्लिक करा
  • तुमच्यासमोर Find Support or Report Profile हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • Pretending To Be Someone हा पहिला पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. पुढे तुम्हाला 3 पर्याय दिसतील. Me, A Friend, Celebrity
  • आपण आपल्याच बनावट खात्याला रिपोर्ट करत असल्यास त्यापैकी Me हा पर्याय सिलेक्ट करून आणि नेक्स्ट वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या नावे तयार झालेले बनावट खाते काही वेळाने आपोआप
    बंद होईल .
  • आपण दुसर्‍याच्या बनावट खाते बंद करण्यासाठी रिपोर्ट करीत असल्यास आपल्याला आलेल्या फेक फ्रेंड रिक्वेस्टवरील खात्यावर जावून वरीलप्रमाणे सूचनांचे पालन करुन चश ऐवजी A Friend सिलेक्ट करा. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर नाव टाईप करण्यासाठी तुमच्यापुढे एक बॉक्स येईल. त्या बॉक्समधे तुमच्या ज्या मित्राचे बनावट खाते बनवले आहे त्याचे नाव टाईप करा. त्या ठिकाणी तुमच्या मित्राचे ओरिजिनल फेसबुक खाते दिसेल, त्यावर क्लिक करून रिपोर्ट सेंड करा. बनावट खाते काही वेळाने बंद होईल.

पोलिसांच्या नावे फेसबुकवर बनावट खाते तयार करून पैसे मागण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यभर हे प्रकार सुरू आहे. पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या नावे देखील चोरट्यांनी पैसे मागण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. काही प्रकरणात तांत्रिक तपासाअंती महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. त्यानुसार, काम सुरू आहे.

                                       – डॉ. संजय तुंगार, सायबर सेल, पिंपरी- चिंचवड.

Back to top button