यंत्रणांनी जबाबदारीने काम केले : खा. सुप्रिया सुळे | पुढारी

यंत्रणांनी जबाबदारीने काम केले : खा. सुप्रिया सुळे

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : भिगवण येथील अल्पवयीन मुलीचे प्रकरण अतिशय गंभीर असून, दुर्दैवाने पालकमंत्री नसतानाही संबंधित यंत्रणेने भिगवणप्रश्नी जबाबदारीने काम केले आहे. लवकरच या प्रकरणाचा निकाल आपल्याला मिळणार आहे. तत्कालीन शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी जो ‘छेडछाडमुक्त महाराष्ट्र’ हा जागर राबविला होता, तो पुन्हा एकदा राबविण्याची गरज निर्माण झाल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. भिगवण येथील अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी सुप्रिया सुळे यांनी रविवारी संबंधित शाळेला भेट देऊन याची माहिती घेतली. या वेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

त्या म्हणाल्या की, आज अजित पवार पालकमंत्री असते, तर आत्तापर्यंत भिगवण प्रश्नाचा निकाल आपल्याला दिसला असता. मात्र, पालकमंत्री नसल्याने कोणत्या यंत्रणेशी बोलायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भिगवण पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेचे व भिगवणकरांच्या एकत्रित सहभागाचे त्यांनी कौतुक केले. तसेच, प्रशासकीय हलगर्जीपणाबद्दल आपण जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी बोललो असल्याचे सांगून याची तत्काळ चौकशी होणार असल्याचे त्या म्हणाल्या.

इंदापूर, बारामतीमधील निर्भया पथक चांगले काम करीत असून, याचा आढावा आपण घेतला आहे. पुढील आठवड्यात दीपक केसरकर यांची भेट घेऊन राज्यातील मुलींच्या सुरक्षिततेबाबत तसेच भिगवण घटनेबाबत आपण चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या वेळी बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक दिलीप पवार तसेच सचिन बोगावत, महेश शेंडगे, संदीप वाकसे, प्रमोद नरुटे, अमोल देवकाते, पराग जाधव, सरपंच तानाजी वायसे, राजेंद्र हगारे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button