पिंपरी : दोन डोसनंतरही होतेय कोरोनाची लागण | पुढारी

पिंपरी : दोन डोसनंतरही होतेय कोरोनाची लागण

दीपेश सुराणा: 

पिंपरी : कोरोनाप्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले म्हणून तुम्ही निर्धास्त झाला असाल तर थांबा. त्यानंतरही तुम्हाला कोरोनाची लागण होऊ शकतो. गेल्या दीड वर्षात शहरामध्ये 29 हजार 992 जणांना कोरोनाप्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना झालेला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत स्वतःची काळजी घेणे हा एकमेव पर्याय आहे. तसेच, बूस्टर डोस घेतल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो, असे मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या वाढली आहे. गुरुवारी (दि. 18) 57 तर, बुधवारी (दि. 17) 61 रुग्ण आढळले. बुधवारी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, 16 तारखेला मात्र केवळ 29 रुग्ण आढळले होते. म्हणजे रुग्णसंख्या कमी होत असताना अचानक त्यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे.

शहरामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला 16 जानेवारी 2021 पासून सुरुवात झाली. लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून 11 ऑगस्ट 2022 पर्यंत म्हणजे जवळपास दीड वर्षात कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही तब्बल 29 हजार 992 जणांना कोरोना झालेला आहे. तर, लसीचा एक डोस घेतल्यानंतर 3 हजार 851 जणांना कोरोना झाला असल्याची माहिती महापालिका वैद्यकीय विभागाकडून मिळाली आहे.

बूस्टर डोस ठरू शकतो उपयुक्त
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना होत असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी बूस्टर डोस (प्रिकॉशन डोस) उपयुक्त ठरू शकतो. कोरोना लसीची सुरक्षितता कालांतराने कमी होऊ शकते. त्यामुळे तिसरा डोस महत्त्वाचा ठरतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. शहरात आजअखेर एकूण 37 लाख 32 हजार 918 नागरिकांना कोरोनाचे लसीकरण केले आहे. त्यामध्ये पहिला, दुसरा आणि प्रिकॉशन डोस यांचा समावेश आहे. आत्तापर्यंत एकूण 1 लाख 73 हजार 845 नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. सध्या महापालिकेच्या 8 केंद्रांवर मोफत बूस्टर डोस दिला जात असल्याने नागरिकांनी त्याचा फायदा घ्यायला हवा.

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काय कराल?
दररोज पुरेशी झोप घ्यायला हवी.
सकस व पौष्टिक आहार घ्यावा.
रात्री उशिरापर्यंत जागरण करणे टाळावे.
नियमित व्यायाम, योगासन, ध्यानधारणा करावी.
आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध यांचा समावेश असावा.

 

कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते. मात्र, लस घेतल्यामुळे कोरोनामुळे होणारा त्रास कमी होण्यास मदत मिळते. लसीकरणानंतरही जर कोरोना होत असेल तर स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच, रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर द्यायला हवा.
    – डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

 

Back to top button