पिंपरी : रेशनिंग दुकानात लवकरच कॉमन सर्व्हिस सेंटर | पुढारी

पिंपरी : रेशनिंग दुकानात लवकरच कॉमन सर्व्हिस सेंटर

नंदकुमार सातुर्डेकर : 

पिंपरी : केंद्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने रेशनिंग दुकानदारांना कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे पिंपरी- चिंचवड शहरातील 253 रेशनिंग दुकानांमध्ये आता कॉमन सर्व्हिस सेंटर (सामान्य सेवा केंद्र) सुरू होणार आहे. साहजिकच शहरवासीयांना या केंद्रांतून ई- सेवा केंद्राप्रमाणेच सुमारे साडेचारशे सेवा उपलब्ध
होणार आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 253 रेशनिंग दुकाने आहेत. त्यात पिंपरी विभागात 77, चिंचवड विभागात 93, तर भोसरी विभागात असलेल्या 83 दुकानांचा समावेश आहे . या दुकानांमध्ये आता पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग परवाना, पासपोर्ट, एलआयसी इत्यादी संदर्भात कामे करता येणार आहेत. त्यामुळे साहजिकच नागरिकांना तालुक्यात अथवा संबंधित ऑफिसला जाण्याचा त्रास व खर्च वाचणार आहे.

31 ऑगस्टपर्यंत रेशनिंग दुकानदारांनी यासंबंधीचे कामकाज पूर्ण करावे म्हणजे एक सप्टेंबरला प्रत्यक्षात कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करता येईल, असे आदेश देण्यात आले आहेत. कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्यास रेशनिंग दुकानदारांना परवानगी देण्यात आल्याने दुकानदारांना त्यांचे उत्पन्न वाढविण्याचा एक स्त्रोत उपलब्ध होईल. त्याचबरोबर नागरिकांनाही विविध प्रकारच्या साडेचारशे सेवा उपलब्ध होऊ शकतील .

पिंपरी- चिंचवडमधील 253 रेशनिंग दुकानदारांना कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने 31 ऑगस्टपर्यंत कामकाज पूर्ण करावे. त्यानुसार एक सप्टेंबर 2022 पासून अशी सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देता येईल.
                                           -दिनेश तावरे , परिमंडळ अधिकारी, निगडी

सरकारने कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे; मात्र त्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हायला हवी. सॉफ्टवेअर डेव्हलप करून घेतले पाहिजे. वेगवान नेटवर्क सुविधा मिळायला हवी, तरच ही योजना यशस्वी होईल.
                        -विजय गुप्ता, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर फेडरेशन.

Back to top button