बिबवेवाडी : कचर्‍यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर | पुढारी

बिबवेवाडी : कचर्‍यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

बिबवेवाडी; पुढारी वृत्तसेवा: मार्केट यार्ड येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीच्या तिन्ही प्रवेशद्वाराजवळ नागरिकांकडून सर्रास कचरा टाकण्यात येत आहे. उघड्यावर टाकण्यात येत असलेल्या कचर्‍यामुळे परिसरात दुर्गंधी वाढली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आंबेडकरनगरमधील कचरा गोळा करण्याचे काम एका खासगी स्वयंसेवी संघटनेला देण्यात आले आहे.

महापालिकेचे कर्मचारी व संबंधित संस्थेचे स्वयंसेवक यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने नागरिकांकडून कचरा नेमलेल्या स्वयंसेवककडे दिला जात नाही. किंबहुना काही वेळा स्वयंसेवक घराघरातून कचरा गोळा करत नाहीत. त्यामुळे, नागरिक दररोज सकाळी प्रवेशद्वाराच्या जवळच कचरा टाकून निघून जाण्याचे प्रकार घडत आहेत. परिसरात कचराकुंडी नसल्याने रस्त्यावर कचर्‍यासह दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून त्याठिकाणी माश्या, भटकी जनावरे, कुत्रे यांचा वावर वाढला आहे.

झोपडपट्टीतील कचरा गोळा करणार्‍या स्वयंसेवी संघटनेचे सेवक व संस्थेचे कर्मचारी कचरा उचलण्याचा मोबदला दिला जात नसल्याच्या कारणावरून कचरा नेण्यासाठी टाळाटाळ करतात. येथील कचर्‍याच्या पाण्याच्या व रस्त्याच्या प्रश्नाबाबत मागील तीन महिन्यापासून या भागातील सामाजिक कार्यकर्ते सतत आंदोलन करतात.

स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक व महानगरपालिकेचे अधिकारी यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे या ठिकाणचा कचर्‍याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे, रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाने कचर्‍याच्या समस्येतून नागरिकांची सुटका करावी.
                                                  – शशिकांत नांगरे, सामाजिक कार्यकर्ते

झोपडपट्टी परिसरातील कचरा उचलण्याचे काम स्वच्छ या संस्थेकडे आहे. त्यावर महानगरपालिकेचे नियंत्रण आहे. झोपडपट्टीतील कचरा रस्त्यावर टाकणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल, तसेच झोपडपट्टीच्या परिसरात यापुढे कचरा साठवला जाणार नाही याची दक्षता घेण्यात येईल.
                       – अनिल सोनवणे, सहाय्यक आयुक्त, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय.

Back to top button