पुणे : चौदा वर्षांनी झाली तीन महिन्यांची शिक्षा; धनादेश न वटल्याचे प्रकरण | पुढारी

पुणे : चौदा वर्षांनी झाली तीन महिन्यांची शिक्षा; धनादेश न वटल्याचे प्रकरण

पुणे; पुढारी वृत्तसेवा: धनादेश न वटल्याच्या प्रकरणात विजयसिंह नरसिंहा तांबोळकर (रा. कात्रज-कोंढवा रस्ता) यास न्यायालयाने तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. बिराजदार यांनी हा निकाल दिला. तब्बल चौदा वर्षांनंतर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. याबाबत प्रशांत अशोक गांधी (रा. शुक्रवार पेठ) यांनी अ‍ॅड. रोहित देशपांडे आणि अ‍ॅड. श्रीनिवास मोरे यांच्यामार्फत न्यायालयात दावा दाखल केला होता. तांबोळकर आणि गांधी यांची व्यावसायिक ओळख होती.

गांधी प्रकाश एंटरप्रायझेसचे प्रोप्रायटर आहेत आणि ते जीओल कॉर्पोरेशनचे डिस्ट्रिब्युटर होते, तर तांबोळकर जीओल कॉर्पोरेशनचा व्यवस्थापक होता. आर्थिक अडचण असल्याचे कारण सांगत 10 जून 2008 रोजी 60 हजार रुपये आरोपीने हातउसने घेतले होते. या बदल्यात 15 दिवसांच्या कालावधीसाठी दिलेला धनादेश बाऊन्स झाला होता.

तक्रारदाराने दिलेल्या नोटिशीला उत्तर देताना ‘फिर्यादीने ऑफिसमधून धनादेश चोरला,’ असा बचाव आरोपीने केला. मात्र, धनादेश चोरीला गेल्याची पोलिसांत तक्रार का दिली नाही? बँकेतून पेमेंट का थांबविले नाही? यावरून आरोपीचे वागणे संशयास्पद असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा निकाल दिला.

धनादेश कायदेशीर दिला होता. याबाबत पुरावे असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. आरोपीने सहा टक्के व्याज आणि कोर्ट फीसह 1 लाख 11 हजार 600 रुपये निकालाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत द्यावेत, असेही आदेशात म्हटले आहे. दंड न भरल्यास आरोपीला दोन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.

Back to top button