मतदार नोंदणी कमी असलेल्या भागात जनजागृती; केंद्रीय निवडणूक आयोगाची सूचना | पुढारी

मतदार नोंदणी कमी असलेल्या भागात जनजागृती; केंद्रीय निवडणूक आयोगाची सूचना

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मतदारांची नोंदणी कमी असलेल्या भागात जनजागृतीचे उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त नितेश व्यास यांनी शुक्रवारी पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांतील निवडणूकविषयक कामकाजाचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपस्थित होते.

व्यास यांनी 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम, मतदार यादीतील नोंदीचे आधार क्रमांकाच्या आधारे प्रमाणीकरण, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे प्रशिक्षण, स्वीप कार्यक्रम तसेच मतदान केंद्राबाबत माहिती घेतली. जिल्ह्यातील ज्या मतदारांची नोंदणी कमी असलेल्या भागात जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सातार्‍याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी जिल्ह्यातील मतदार नोंदणी, आधार जोडणी स्थिती, मतदान केंद्र, मतदार जनजागृती, नवमतदार, तृतीयपंथी मतदार नोंदणी तसेच मतदान प्रक्रियेबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

Back to top button