पिंपरी चिंचवडमध्ये दहीहंडीची धूम ! | पुढारी

पिंपरी चिंचवडमध्ये दहीहंडीची धूम !

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : गोविंदा पथकांचा उत्साह, बघ्यांची गर्दी, दहीहंडी फोडण्याची एकमेकांत वाढणारी चुरस, गोविंदा रे गोपाळा, ढाक्कुमाकूम… ढाक्कुमाकूम या गाण्यांच्या तालावर थिरकणारे तरुण, सेलिब्रिटींची प्रतीक्षा, चाहत्यांची वाढती गर्दी, अशा उत्कंठावर्धक वातावरणात दहीहंडी पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या जल्लोषात साजरी झाली. दोन वर्षांनंतर रंगलेला हा दहीहंडी उत्सवात बघ्यांची मोठी गर्दी पहायला मिळाली. तसेच नागरिकांचा उत्साह वाढलेला होता.

सेलिब्रिटींनी लावलेली उपस्थितीत तरूणाईमध्ये मोठा जल्लोष निर्माण करत होती. शहरात पिंपरीगाव, वाकड, मोशी, भोसरी याठिकाणी मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शहरातील इतर ठिकाणीही सार्वजनिक मंडळांनी छोट्या प्रमाणात दहीहंडीचे आयोजन केल्याचे पहायला मिळाले. डीजेच्या तालावर लावलेली गाणी त्यावर थिरकणारी पावले, लेजर शो, गोविंदा पथकांची एकमेकांमध्ये लागलेली चुरस यांनी वातावरण भारावून गेले होते. दोन वर्षे या वातावरणाला नागरिकांना मुकावे लागले होते.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा शहरातील गोविंदा पथकांना लाखोंच्या सुपार्‍या आणि मोठ्या प्रमाणात सेलिब्रिटींवर खर्च करण्यात आला आहे. यावर्षी दहीहंडीमध्ये मराठी कलाकारांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. मोशीमध्ये साईनाथ मित्र मंडळाची सर्वात मोठी दहीहंडी होती. पिंपरीगावामध्ये संदीप वाघेरे युवा मंच, मोशीतील नागेश्वर महाराज दहीहंडी, वाकड कस्पटे वस्ती, भोसरी, सानेचौक अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहीहंडी साजरी करण्यात आली.

शहरात दरवर्षी बाहेरील गोविंदा पथक दहीहंडी फोडण्यास येतात. यावर्षी देखील मुंबईतील ठाणे, चेंबूर, याठिकाणची गोविंदा पथके आली होती. पथकांकडून प्रथम सलामी देण्यात आली. रात्री साडेनऊ दहा पर्यत दहीहंडी उत्सवाची शहरात धूम होती. रात्री दहापर्यंतच परवानगी असल्याने मंडळांनी दहाच्या आत दहीहंडी फोडून सण आनंदात साजरा केला.

 

Back to top button