पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया वेगात; पारंपरिक अभ्यासक्रम मात्र संथ गतीने | पुढारी

पुणे : व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया वेगात; पारंपरिक अभ्यासक्रम मात्र संथ गतीने

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया वेगात तर पारंपरिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया मात्र संथ गतीने होत असल्याचे दिसून येत आहे. बारावीचा निकाल लागून दोन महिने सरले. अद्याप कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचे प्रवेश संथ गतीने सुरू आहेत; तर दुसरीकडे बीबीए, बीसीए सायन्स, बीसीएसचे प्रवेश हाऊसफुल्ल होऊन तासिकांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पारंपरिकपेक्षा व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे ओढा वाढला आहे. बारावीचा निकाल 16 जून रोजी लागला.

सध्या एमएचटी सीईटी परीक्षा सुरू आहेत. नीटच्या निकालाची प्रतीक्षा आहे. परंतु, पदवीपूर्वीच कॅम्पसमधून नोकरीच्या संधी मिळत असल्याने विद्यार्थ्यांचा पारंपरिक शिक्षणापेक्षा बीबीए, बीसीए आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे ओढा आहे. त्या तुलनेत पारंपरिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमीच असल्याचे शहरातील विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी स्पष्ट केले आहे. पारंपरिक शिक्षणात विज्ञान शाखेला सर्वाधिक पसंती मिळत आहे. यातही कौशल्य असलेल्या विज्ञान शाखेतील अभ्यासक्रम शिकण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे.

पारंपरिक शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांना अलिकडे व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे जाण्याची ओढ असल्याचे दिसते. त्यामुळेच पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशात 20 ते 25 टक्क्यांनी घट झाली आहे. विद्यार्थ्यांचे आता अगोदरच ठरलेले असते नेमका कुठे प्रवेश घ्यायचा आहे. त्यामुळे विद्यार्थी करिअरचा विचार करूनच अभ्यासक्रम निवडत असल्याचे दिसून येत आहे.
                                       – डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय

Back to top button