पुणे : दिव्यांगांच्या शाळांची तपासणी: मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचा आदेश | पुढारी

पुणे : दिव्यांगांच्या शाळांची तपासणी: मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचा आदेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळांची शिक्षण विभागाकडून तपासणी होणार आहे. शाळांमध्ये चांगल्या भौतिक सुविधा पुरवल्या जात आहेत का? याची वर्षातून तीनवेळा तपासणी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिले आहेत. या शाळांमधील त्रुटी दूर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात येणार असून, त्या पूर्ण न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.

जिल्ह्यात दिव्यांगांच्या 77 विशेष शाळा व कर्मशाळा आहेत. या शाळांची तपासणी केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी यांच्या मार्फत करण्याचे नियोजन केले जाणार आहे. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राज्यातील शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी कार्यक्षमता प्रतवारी निश्चित केली आहे. त्या अनुषंगाने ही तपासणी होणार आहे. या शाळांची वर्षांतून तीन वेळा तपासणी करण्यात येणार आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या निकषांनुसार या शाळांमध्ये किमान 90 बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. या तपासणीतून त्यांची सद्य:स्थिती पाहण्यात येईल. त्रुटी दूर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत दिली जाईल. त्यानंतर मात्र कारवाई केली जाईल.

                                     – आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.

Back to top button