भिगवणचा वर्गशिक्षक अखेर निलंबित; सहावीतील मुलींशी अश्लील चाळे केल्याचे प्रकरण | पुढारी

भिगवणचा वर्गशिक्षक अखेर निलंबित; सहावीतील मुलींशी अश्लील चाळे केल्याचे प्रकरण

भिगवण/पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेच्या भिगवण येथील प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावीतील मुलींशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला वर्गशिक्षक दादासाहेब अंकुश खरात (वय 42, रा. कल्याणीनगर, बारामती, पुणे) याला अखेर निलंबित करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी विजयकुमार परीट आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी दिली. खरात याला उद्या शनिवार (दि.20) पर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

दै.‘पुढारी’ने सडेतोड वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध करताच गांभीर्याने याची दखल घेण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आल्याचे परीट यांनी सांगितले. तसेच प्राथमिक शाळेतील अल्पवयीन मुलींचे समुपदेशन करण्यासाठी महिला बालकल्याण समितीला पाचारण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद पातळीवरून या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तत्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. खरात विरोधात विभागीय चौकशी होणार आहे.

अशा प्रकारच्या घटनांची गंभीर दखल घेतली जाईल. हे अतिशय गंभीर प्रकरण असून, यात कोणाचीही गय केली जाणार नाही. या प्रकरणात स्थानिक पुढारी, तसेच नागरिकांकडून संबंधितांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. हे प्रकरण पोस्को कायद्यांतर्गत येत असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांना यात लक्ष घालण्यास सांगितले आहे. यात कोणताही खासगी किंवा शासकीय व्यक्ती आढळून आल्यास त्याची गय केली जाणार नाही.

                                       – आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी

शिक्षकाचे हे कृत्य अशोभनीय आहे. अशा प्रकारचे कृत्य करणार्‍याची गय केली जाणार नाही. त्यामुळे कठोरात कठोर कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर याबाबत सर्व शिक्षकांसाठी शिक्षण विभागाकडून परिपत्रकही जारी केले जाणार आहे.

                                   -संध्या गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प.

Back to top button