पुणे : मोबाईल हिसकावणारे दुचाकीस्वार चोरटे जेरबंद | पुढारी

पुणे : मोबाईल हिसकावणारे दुचाकीस्वार चोरटे जेरबंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मोबाईल हिसकावणार्‍या दोघा दुचाकीस्वार चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून 3 लाख रुपये किमतीचे 21 मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. विकास ऊर्फ कात्या सुरेश वाघरे (21, रा. येरवडा), शुभम ऊर्फ सोनू विजय राजपूत (25, रा. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील वाघरे हा रेकॉर्डवरील सराईत आहे. त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. गर्दीचे ठिकाण शोधून मोबाईलवर बोलत थांबलेल्या व्यक्तींचे मोबाईल चोरटे भरधाव वेगात येऊन हिसकावत होते.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी मोबाईल हिसकावण्याचा सपाटा लावला आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वारगेट पोलिस हद्दीमध्ये गस्त घालत होते. त्या वेळी नागरिकांकडील मोबाईल हिसकवणारे संशयित चोरटे स्वारगेट परिसरातील सारसबाग येथे आल्याची माहिती पोलिस कर्मचारी संदीप घुले, अजय पडोळे, अनिस शेख, मुकुंद तारू यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्या सूचनेनुसार सहायक निरीक्षक प्रशांत संदे यांच्या पथकाने दोघा संशियतांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांची चाहूल लागतात दोघांनी पळ काढला. प्रसंगावधान राखत पथकाने दोघांना पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत चोरीचे 21 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

Back to top button