
पुणे; पुढारी वृत्तसेवा: गडकिल्ल्यांची भटकंती असो वा निसर्गरम्य ठिकाणची भटकंती…थंड हवेचे ठिकाण असो वा जंगलातील भटकंती…असे सारे काही आता तरुण छायाचित्रकारांनाही खुणावू लागले आहे. त्यामुळेच आता तरुण छायाचित्रकार मोठ्या प्रमाणात पर्यटन छायाचित्रणाकडे वळले आहेत. 18 ते 35 वयोगटातील तरुणाई प्रामुख्याने देशविदेशात भटकंती करून तेथील निसर्ग असो वास्तुरचना…असे कित्येक गोष्टींची छायाचित्रे टिपत आहेत. मोबाईलसह डीएसएलआर कॅमेर्यावर छायाचित्रे टिपून ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. त्यांच्या छायाचित्रांना पसंतीही मिळत असून, काहींसाठी पर्यटन छायाचित्रण करिअरचा पर्याय बनला आहे. या पर्यटन छायाचित्रांचे ऑनलाइन-ऑफलाइन प्रदर्शनही भरविले जात आहेत.
तरुणाई महाराष्ट्रासह केरळ, गोवा, कर्नाटक, गुजरात, राजस्थानसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इटली, मॉरिशिअस, मलेशियात जाऊन ते छायाचित्रणासह विविध प्रकारचे व्हिडिओही बनवत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या छायाचित्रांना आणि व्हिडिओला चांगला प्रतिसाद आहे. शुक्रवारी (दि.19) साजरा होणार्या जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त दै. पुढारीने तरुणाचे पर्यटन छायाचित्रणाचे वेड जाणून घेतले. काही जण तर ट्रॅव्हल कंपन्यांसाठी काम करीत आहेत, तर काही जण सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या व्यासपीठांसाठी आपली छायाचित्रे देत आहेत.
छायाचित्रकार विवेक गाटे म्हणाले, 'मी ठिकठिकाणी पर्यटनासाठी गेलो, की तेथील छायाचित्रे कॅमेर्यावर टिपतो. सोशल मीडियावर ही छायाचित्रे अपलोड केल्यावर त्याला अनेकांची पसंती मिळते. सध्या पर्यटनाविषयी लोकांमध्ये कुतुहलता आहे. पर्यटनावर आधारित छायाचित्रे पाहून त्यांना नवीन जागांची माहिती मिळते. म्हणूनच जी ठिकाणे लोकांना माहीत नाही, अशा ठिकाणी फिरून मी छायाचित्रांद्वारे त्याची माहिती लोकांपर्यंत पोचवतो.'