पुणे : रस्ता खोदला; बुजवणार कोण? | पुढारी

पुणे : रस्ता खोदला; बुजवणार कोण?

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गोळीबार मैदान ते पुलगेट रस्ता एमएनजीएलची (महानगर गॅस लिमिटेड) गॅस वाहिनी टाकण्यासाठी खोदण्यात आला. परंतु, त्याची दुरुस्तीच करण्यात आली नाही. परिणामी, रस्त्यावर खड्डे असून, खडी पसरली आहे. रस्त्यावरील खडीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पुलगेट ते गोळीबार मैदान असा खोदलेला रस्ता, भले मोठे गतिरोधक आणि त्यात खड्ड्यांची भर आणि पाऊस होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

एमएनजीएलने गॅस वाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदाईची परवानगी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेतली. रस्ता खोदून गॅस वाहिनीही टाकली. परंतु, रस्ता दुरुस्त करण्यास ते विसरले आहेत. त्यामुळे एमएनजीएलवर बांधकाम विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. तर, दुसरीकडे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे 25 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. दरम्यान, रस्ता दुरुस्त करावा, असे पत्र पुणे कँटोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेे. मात्र, त्याचा काहीही परिणाम बांधकाम विभागावर झालेला दिसून येत नाही.

कँटोन्मेंटकडेच नागरिकांची तक्रार
गोळीबार चौकातील रस्ता हा पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येत असल्याने नागरिक रस्ता दुुरुस्तीच्या मागणीसाठी बोर्डाकडेच धाव घेत आहेत. मात्र, हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील आहे. हा रस्ता दुरुस्त करा, असे पत्र देण्यात आला आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

पुणे कँटोन्मेंट कार्यालयासमोरील रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील आहे. हा रस्ता गॅस वाहिनीसाठी खोदण्यात आला आहे. रस्त्याची दुरुस्ती केली जाणार असून, त्यासाठी सुमारे 25 लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल.

            – मैथिली झांझुर्णे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे.

 

Back to top button