पुणे : डॉक्टरचे अपहरण करून लुटणारा जेरबंद | पुढारी

पुणे : डॉक्टरचे अपहरण करून लुटणारा जेरबंद

पुणे : सहा महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत तीन लाखांच्या खंडणीसाठी शिरूर तालुक्यातील डॉक्टरचे अपहरण करून त्यांना लुटणार्‍या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने अटक केली. त्याला वारजे माळवाडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले. गौरव सुरेश बिरूंगीकर (रामनगर, वारजे माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. फेब्रुवारी महिन्यात बिरूंगीकर आणि त्याच्या इतर पाच साथीदारांनी तीन लाख रुपयांची मागणी करीत शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एका डॉक्टरचे अपहरण केले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, तर उर्वरित चौघांचा शोध सुरू होता.

खंडणीविरोधी पथक एकचे कर्मचारी हद्दीमध्ये गस्त घालत होते. या दरम्यान अपहरणाच्या गुन्ह्यातील वाँटेड आरोपी बिरूंगीकर वारजे माळवाडी पुलाखाली येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानुसार पथकाने सापळा रचून बिरूंगीकरला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने इतर साथीदारांच्या मदतीने पैशांसाठी डॉक्टरचे अपहरण केल्याचे कबूल केले. यानुसार पथकाने बिरूंगीकर याला अटक करून शिरूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. खंडणीविरोधी पथक एकचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास जाधव, अंमलदार नितीन कांबळे, किरण ठवरे, अमोल आवाड, दुर्योधन गुरव, विजय कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

Back to top button