पुणे : कारागृहातून बाहेर पडताच महिला पोलिसाला गंडा | पुढारी

पुणे : कारागृहातून बाहेर पडताच महिला पोलिसाला गंडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: बदलीच्या धमकीने येरवडा कारागृहातील एका महिला पोलिस कर्मचार्‍याला दहा हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अमित जगन्नाथ कांबळे (वय 35, रा. फिरस्ता) या ठगाला अटक केली आहे. याबाबत 26 वर्षीय महिला कर्मचार्‍याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार कांबळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 ऑगस्ट 2022 रोजी घडला आहे. अमित कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध विविध ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तो पूर्वी एका गुन्ह्यात येरवडा कारागृहात होता. आठ-दहा दिवसांपूर्वी तो बाहेर आला आहे.

त्याने फिर्यादी पोलिस कर्मचारी महिलेला फोन करून एडीजी (अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह, सुधारसेवा महाराष्ट्र राज्य) ऑफिसवरून क्लर्क इंगोळकर दादा बोलतोय, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादींना तुमची बदली करण्यात येत आहे. तसेच तुम्ही ज्या ठिकाणी कर्तव्यावर होता तेथील पाच ते सहा तक्रारी आल्या असून, तुमच्या सोबतच्या ड्युटी पॉईंटवरील पाच मुलींना सस्पेंड करण्यात येत आहे. मात्र, मी सोल्यूशन काढतो. एडीजी साहेबांशी बोलतो. त्यासाठी गुगल पे खात्यावर 10 हजार रुपये पाठवून द्या, असे सांगितले.

मात्र, त्या वेळी फिर्यादी कर्मचारी महिलेने मी पैसे देऊ शकत नाही, असे म्हटले असता, आरोपीने तुमची ऑर्डर काढण्यात येईल, ऑर्डर टाईप करीत आहे, असे म्हटले. त्यामुळे फिर्यादी कर्मचारी घाबरल्या. त्यांना खरोखरंच कोणी तरी एडीजी ऑफिसमधून कॉल केला असेल, असे वाटल्याने त्यांनी पैसे ट्रान्सफर केले. दरम्यान, या संबंधित प्रकरणाची फिर्यादी महिला पोलिस कर्मचार्‍याने माहिती घेतली असता, इंगोळकर दादा नावाचा कोणताही क्लार्क एडीजी कार्यालयात नसल्याचे समोर आले.

आरोपीकडून यापूर्वीही अनेकांची फसवणूक
आरोपी कांबळे याने अनेक लोकांची फसवणूक केली आहे. त्याच्याविरुद्ध विविध ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने अशाप्रकारे इतर चार ते पाच महिला कर्मचार्‍यांना फोन करून पैशाची मागणी केल्याचेदेखील पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यांना वेळीच ठगवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आला. त्यामुळे प्रतिसाद देण्याचे टाळले. कांबळे याने कारागृहात कर्तव्यावर असलेल्या महिला कर्मचार्‍यांचे वैयक्तिक संपर्क क्रमांक मिळवले कसे, हादेखील मोठा प्रश्न आहे. तपास करीत असताना, पोलिस उपनिरीक्षक वारंगुळे यांना हा गुन्हा कांबळे याने केला असल्याची माहिती मिळाली. तो ससून रुग्णालय परिसरात असल्याचे समजले. तेथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

 

Back to top button