पुणे : मेट्रो धावणार जमिनीखालून; ट्रेनची भूमिगत चाचणी लवकरच | पुढारी

 पुणे : मेट्रो धावणार जमिनीखालून; ट्रेनची भूमिगत चाचणी लवकरच

 पुणे; पुढारी वृत्तसेवा: मेट्रोच्या ताफ्यात रिच 1 लाईनमधील पहिला मेट्रो ट्रेनचा रॅक दाखल झाला आहे. त्यामुळे आगामी काळात फुगेवाडी ते सिव्हिल कोर्टदरम्यान असलेल्या कृषी महाविद्यालय (रेंजहिल्स) ते सिव्हिल कोर्ट या भूमिगत मार्गावर लवकरच मेट्रो ट्रेनची चाचणी होणार आहे. पुणे शहरात सुरू असलेल्या मेट्रो ट्रेनच्या अद्ययावत कामांची माहिती देण्यासाठी मेट्रो प्रशासनाने गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी ही माहिती दिली. यावेळी मेट्रोचे संचालक अनंत गाडगीळ, महाव्यवस्थापक हेमंत सोनावणे उपस्थित होते. गरवारे ते सिव्हिल कोर्ट आणि फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट यादरम्यान मेट्रो ट्रेनद्वारे प्रवासी वाहतूक सेवा लवकरात लवकर सुरू करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे मेट्रो अधिकार्‍यांनी सांगितले.

शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात
कृषी महाविद्यालय ते स्वारगेट दरम्यानच्या भूमिगत मार्गावरील शिवाजीनगर आणि सिव्हिल कोर्ट मेट्रो स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या स्थानकांची कामे जवळपास 80 ते 90 टक्के पुर्ण झाली आहेत. त्यामुळे या स्थानकादरम्यान असलेल्या भूमिगत मार्गावर आम्ही चाचणी घेणार असल्याचे मेट्रो अधिकार्‍यांनी सांगितले; तसेच अधिकार्‍यांनी सिव्हिल कोर्ट स्थानकात काय काय सुविधा असणार, याचीदेखील माहिती यावेळी दिली.

नदीकिनारी लावले पहिले झाड
मुठा नदीकिनारी असलेल्या सिव्हिल कोर्ट स्थानकाच्या शेजारी मेट्रो प्रशासनाकडून झाडे लावण्याचे नियोजन आहे. त्यानुसार मेट्रो प्रशासनाने गुरुवारी पहिले झाड नदीकिनारी लावले आहे. आणखी झाडे मेट्रो नदीकिनारी लावणार आहे. यात मेट्रो आगामी काळात जांभूळ, करंज आणि पाम (सिंधी) ही झाडे लावणार आहे.

सिव्हिल कोर्ट स्थानकाशेजारी उभारणार पीएमपी बस टर्मिनल
पुणे महानगरपालिकेसमोर असलेले पीएमपीचे बस स्थानक सिव्हिल कोर्ट स्थानक झाल्यावर त्याच्या शेजारी हलविण्याचा मेट्रोचा प्रस्ताव आहे. मेट्रो प्रशासनाकडून सिव्हिल कोर्ट स्थानकाशेजारी लागूनच बस टर्मिनल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात महानगरपालिकेसमोर पीएमपीच्या बसमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

सध्या फुगेवाडी ते दापोडी ट्रायल रन सुरू आहे. नुकताच एक मेट्रो ट्रेनचा रॅक रिच 1 लाईनकरिता ताफ्यात दाखल झाला आहे. त्यामुळे आगामी गाळात लवकरच रेंजहिल ते सिव्हिल कोर्ट भूमिगत मार्गावर मेट्रो ट्रेनची ट्रायल घेण्यात येईल.
– डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

भूमिगत स्थानकांच्या कामाची
अद्ययावत माहिती

शिवाजीनगर
80 ते 90%

कृषी महाविद्यालय
(रेंज हिल) 80%

बुधवार पेठ
70%
सिव्हिल कोर्ट
80 ते 90%

मंडई
70%

स्वारगेट
70%

Back to top button