सरकार बदलले; अधिकारीही बदलणार! पिंपरी-चिंचवडच्या महापालिका आयुक्तांनंतर पीएमआरडीए आयुक्तांची बदली | पुढारी

सरकार बदलले; अधिकारीही बदलणार! पिंपरी-चिंचवडच्या महापालिका आयुक्तांनंतर पीएमआरडीए आयुक्तांची बदली

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यातील सरकार बदलल्यानंतर पहिला बदल केला जातो तो सरकारी अधिकार्‍यांचा. त्यातूनच आता बदल्यांचे सत्र सुरू झाले असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांपासून पुण्यातील बदल्यांना सुरुवात झाली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त सुहास दिवसे यांची बदली करून गुरुवारी त्यांच्या जागेवर राहुल रंजन महिवाल यांची नियुक्ती करण्यात आली. महाविकास आघाडी सरकारने महत्त्वाच्या पदांवर मर्जीतील व्यक्तींची नियुक्ती केली होती. सत्तांतर झाल्यानंतर आता या सरकारनेही त्यांच्या मर्जीतील अधिकार्‍यांची आणि पुढील निवडणुकांचे आडाखे डोळ्यांसमोर ठेवून नको असलेल्या अधिकार्‍यांच्या बदल्यांना सुरुवात केली आहे.

मागच्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची बदली करण्यात आली. स्थानिक पातळीवर या बदलीबाबत चर्चेला उधाण आले होते. भाजपच्या पदाधिकार्‍यांसोबत पटत नसल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा पिंपरी-चिंचवड भागात सुरू आहे. त्यानंतर आता गुरुवारी अनेक प्रकल्पांची कामे मार्गी लावणार्‍या सुहास दिवसे यांचीदेखील बदली करण्यात आली. त्यांचा पदभार पुण्यातच महिला व बालकल्याण आयुक्त म्हणून असलेल्या राहुल रंजन महिवाल यांना देण्यात आला आहे, तर दिवसे यांना अद्याप कुठल्याच पदाची जबाबदारी दिलेली नाही.

यानंतर इतरही अधिकार्‍यांच्या बदल्या होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, पोलिस, क्रीडा, शिक्षण विभागांसह इतर अधिकार्‍यांच्या बदल्यांचीही चर्चा

महिवाल पुण्यातलेच…
दिवसे यांच्या कारकिर्दीत हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे काम मार्गी लागले; तसेच त्यांच्याच काळात विकास आराखडाही अंतिम टप्प्यात आला. राहुल रंजन महिवाल हे महिला व बालकल्याण आयुक्त म्हणून पुण्यात काम पाहत होते. ते 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते 2005 मध्ये यूपीएसएसीच्या नागरी सेवा परीक्षेत देशात प्रथम आले होते.

Back to top button