राज्यातील सर्व मोठ्या शहरांसह पुण्यातही पोलिसांकडून ‘हाय अलर्ट’ जारी | पुढारी

राज्यातील सर्व मोठ्या शहरांसह पुण्यातही पोलिसांकडून ‘हाय अलर्ट’ जारी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: रायगड येथील समुद्रात गुरुवारी शस्त्रसाठा असलेली एक बोट आढळून आल्यानंतर, राज्यातील सर्व मोठ्या शहरांसह पुण्यातही पोलिसांकडून ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. याबाबत अतिवरिष्ठ अधिकार्‍यांनी सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच कर्मचार्‍यांना सूचना दिल्या असून, यंत्रणा सतर्क झाली आहे. दरम्यान, गुरुवारी दुपारपासूनच पोलिसांकडून महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून कडक तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली. तसेच दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर व गर्दीच्या ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर ठेवण्यात येत आहे. त्यासाठी अडीच हजार पोलिस अधिकारी कर्मचार्‍यांचा तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.

रायगड येथे गुरुवारी शस्त्रसाठा असलेली एक संशयास्पद बोट आढळून आली. संबंधित बोटीबाबत रायगड पोलिस, भारतीय तटरक्षक दल, महाराष्ट्र दहशतविरोधी पथक (एटीएस) यांच्या पथकाने पाहणी करून माहिती घेतली. त्यामध्ये बोट, त्यातील शस्त्रे, बोटीच्या मालकाबाबतची माहिती संबंधित तपास यंत्रणांना मिळाली आहे. तरीही, कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये, यादृष्टीने गुरुवारी पोलिसांकडून ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला. त्यानुसार, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील सुरक्षेचा आढावा घेत सर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शाखा व संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार, पोलिसांकडून गुरुवारी दुपारपासूनच शहरात प्रवेश करण्यात येणार्‍या महत्त्वाच्या रस्त्यांवर नाकेबंदी करून संशयास्पद वाहनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. तसेच प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये विशेष शाखेच्या अंतर्गत कार्यान्वित करण्यात आलेल्या दहशतवाद विरोधी सेललाही सतर्क करण्यात आले असून, त्यांच्या हद्दीतील संशयास्पद घडामोडींवर लक्ष ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. याबरोबरच बॉम्ब शोधक व नाशक पथकालाही सूचना देण्यात आल्या असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.

हरिहरेश्वर येथील बोटीत सापडलेली हत्यारे आणि शहरात आज साजर्‍या होणार्‍या दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व काळजी घेण्यात आली आहे.
                                             – अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त, पुणे.

 

Back to top button