शिक्रापूर : ‘ती’ इर्टिगा कार मेटेंचा पाठलाग करीत नव्हती! कारचा चालक पोलिसांसमोर हजर | पुढारी

शिक्रापूर : ‘ती’ इर्टिगा कार मेटेंचा पाठलाग करीत नव्हती! कारचा चालक पोलिसांसमोर हजर

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा: ‘शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीचा 3 ऑगस्ट रोजी शिक्रापूर (ता. शिरूर, जि. पुणे) येथे पाठलाग झालेला नव्हता, तर त्या इर्टिगा गाडीतून आपण मित्रांसह वाढदिवसासाठी जात होतो, ’ असा खुलासा या गाडीच्या चालकाने बुधवारी (दि. 17) रांजणगाव पोलिस ठाण्यात हजर होऊन केला आहे. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला नसून, हा प्रकार घातपाताचा असल्याचा दावा त्यांच्या एका कार्यकर्त्याने केला होता.

3 ऑगस्ट रोजी बीड ते पुणे यादरम्यान शिक्रापूरनजीक मेटे यांच्या गाडीचा पाठलाग करण्याचा दावाही या कार्यकर्त्याने केला होता. यामध्ये इर्टिगा कार पाठलाग करीत असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. या इर्टिगा कारशी संबंधित संदीप विठ्ठल वीर (रा. भांबर्डे, ता. शिरूर) यांनी रांजणगाव गणपती पोलिस ठाण्यात जाऊन त्यांची गाडी व संबंधित घटनेबाबत खुलासा केला आहे. संदीप वीर यांनी त्यांच्या जबाबात सांगितले आहे की, संदीप विठ्ठल वीर यांचा 3 ऑगस्ट रोजी वाढदिवस होता.

ते इर्टिगा (एमएच 12 टीडी 8239) ही गाडी घेऊन सकाळी रांजणगाव गणपती येथे आले होते. दुपारच्या सुमारास ते रांजणगाव येथून पुणे-नगर महामार्गावरील बेलवंडी फाटा येथे दुपारी जेवणासाठी गेले होते. तेथून परतताना ते शिरूरमध्ये एका नातेवाइकाकडे थांबले असता, रात्री साडेआठ वाजता गावामधून त्यांच्या मित्रांचे ‘केक कापण्यासाठी लवकर या,’ असे फोन येत होते. वाढदिवस साजरा करण्यासाठी गावी लवकर पोहचावे, यासाठी ते तातडीने निघाले होते. वाढदिवस असल्याने त्यांच्यासमवेतचे मित्र जल्लोष करीत होते.

यादरम्यान पुणे-रांजणगाव रस्त्यावर मेटे यांची गाडी पास झाली असेल, तर सांगता येत नाही. आपण केवळ आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी लवकर जाता यावे, यासाठी इतर गाड्या ओव्हरटेक करून जात होतो, असा खुलासा वीर यांनी केला आहे. अधिक चौकशीसाठी पोलिसांनी संबंधित गाडी रांजणगाव पोलिस स्टेशन येथे ठेवली.

Back to top button