पुणे : काही गावांसाठी जलवाहतूक सेवा | पुढारी

पुणे : काही गावांसाठी जलवाहतूक सेवा

पुणे, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये जाण्यासाठी जलसाठे आहेत; मात्र त्या ठिकाणचे दळणवळण ठप्प आहे अशा गावांना आता दळणवळणासाठी जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यातील मोठ्या जलाशयां मध्ये नागरिकांच्या सोयीसाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. मुळशी जलाशयात अशीच जलवाहतूक सेवा सुरू आहे. या सेवेमुळे वडगाव आणि वांद्रे ही दोन गावे महाडला पुण्याशी जोडणार्‍या राष्ट्रीय महामार्गाला जोडली गेली आहेत.

पुणे जिल्ह्यात पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतांमध्ये अनेक मोठे जलसाठे आहेत. नदीच्या अलीकडील आणि पलीकडील अशा दोन्ही तीरांवर आणि तीराच्या बाजूने गावे, वाड्या-वस्त्या आहेत. अनेक गावांची दळणवळण सेवा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने ठप्प झाली आहे.मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था होऊ शकते आणि सखल भागातील पूल पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाल्याने ही जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
‘जलवाहतुकीसाठी असलेल्या प्रत्येक बोटीत प्रवाशांसाठी 20 जागा आहेत. या बोटींमधून मालाची वाहतूकही करता येते. या प्रवासासाठी प्रत्येकी आठ रुपये सेवाशुल्क आकारले जाणार आहे,’ असेही प्रसाद यांनी सांगितले.

Back to top button