पुणे : भाविक, पर्यटकांच्या गर्दीने बनेश्वर हाऊसफुल्ल | पुढारी

पुणे : भाविक, पर्यटकांच्या गर्दीने बनेश्वर हाऊसफुल्ल

नसरापूर, पुढारी वृत्तसेवा : सलग सुट्यांमुळे नसरापूर (ता. भोर) येथील बनेश्वर मंदिर व उद्यानात दिवसभर भाविक व पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. विशेष म्हणजे, भाविकांनी भर पावसात उभे राहून रांगेतून दर्शन घेतले. पिंडीला तिरंग्याच्या आकाराची फुलांनी केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. प्रशासनाचे नियोजन नसल्याने नसरापूर ते मंदिर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

येथील शिवकालीन बनेश्वर मंदिरात सोमवारी (दि. 15) सकाळपासून भाविक व पर्यटकांचा ओघ वाढत गेल्याने सुरक्षेचा विचार करून गाभारा दर्शन बंद करण्यात आले. तरी देखील बाहेरून दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. यामुळे तिसर्‍या श्रावणी सोमवारला जणू महाशिवरात्रीचे स्वरूप आले होते. सायंकाळी चार वाजेपर्यंत जवळपास लाखभर भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज देवस्थान ट्रस्टचे सचिव अनिल गयावळ यांनी व्यक्त केला.

सरकारी व खासगी क्षेत्रामध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना सलग सुट्यांची पर्वणी मिळाली असल्याने अनेकांनी यानिमित्त पर्यटनाचे बेत आखले. सलग सुट्यांचा परिणाम धार्मिक स्थळांवरसुद्धा झाला असून, त्या ठिकाणी भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळली होती. बनेश्वर वनोद्यानात पर्यटकांची झुंबड उडाली होती. प्रशासनाने वाहतुकीचे नियोजन केले नसल्याने नसरापूर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Back to top button