कोसळधारा झेलत कप्रदिकेश्वराचे लाखभर शिवभक्तांनी घेतले दर्शन | पुढारी

कोसळधारा झेलत कप्रदिकेश्वराचे लाखभर शिवभक्तांनी घेतले दर्शन

ओतूर : अवघ्या शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कप्रदिकेश्वर मंदिरात शिवभक्तांनी हर हर महादेवच्या गजरात व कोसळधार पावसात लाखभर भक्तांनी दर्शन घेतले. पहाटे रमेश शिवाजीराव डुंबरे आणि रोहिदास बजाबा अहीनवे या मान्यवरांनी सपत्नीक महापूजा, अभिषेक व महाआरती केल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आल्याची माहिती देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे व सचिव वसंत पानसरे यांनी दिली.

तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त यात्रेला भाविकांची अलोट गर्दी पहायला मिळाली. तिसरा श्रावणी सोमवार दर्शविणाऱ्या शिवलिंगावर तीन कोरड्या तांदळाच्या कलात्मक पिंडी बनविण्यात आल्या होत्या. पटेल ग्रुपच्यावतीने खिचडीचे भाविकांसाठी महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात आले तर हल्दीराम प्रसाद यांनी चिक्की वाटप तसेच स्व. रमण काळे यांचे समरणार्थ केळी वाटप करण्यात आले. यात्रेत विविध प्रकारची मिठाई, पदार्थ, खेळणी, आकाश पाळणे, प्रसाद, बेलफुलांची दुकाने थाटण्यात आली होती.

कोरोना कालावधीनंतर भाविकांचा उत्साह दुनावल्याचे चित्र निदर्शनास आले. संपूर्ण ओतूर गाव व परिसर हर हर महादेवच्या गजराने व भक्तिरसात न्हाऊन निघाला. जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक मंदार जवळे यांचे आदेशानुसार ओतूर पोलीस स्टेशनच्यावतीने ए. पी. आय. परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ए. पी. आय. केरूरकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी गाव आणि परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तसेच ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. यादवराव शेखरे व डॉ. सारोक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना आरोग्य सुविधा पुरविण्यात आल्या. नारायणगाव आगाराच्या वतीने जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. राज्यभर प्रसिद्ध असलेल्या ओतूरच्या कुस्त्यांच्या आखाड्यात राज्यातील नामवंत पैलवानांनी हजेरी लावून नेत्रदीपक कुस्त्यांचे केलेले डावपेच कुस्ती रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. विजेत्या मल्लाना देवधर्म संस्थेच्या वतीने हजारो रुपयांची रोख बक्षिसांचे वाटप करण्यात आले. गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदाच दंगल गर्ल ( महिला कुस्तीगीर) ची एन्ट्री लक्षवेधी ठरली. इतर सर्व मल्लानी नेत्रदीपक कुस्त्या करून आखाड्यास रंगत आणली.

Back to top button