देश, देव, धर्म ही आपल्या जीवनातील अविभाज्य अंग : डॉ. सुशील महाराज | पुढारी

देश, देव, धर्म ही आपल्या जीवनातील अविभाज्य अंग : डॉ. सुशील महाराज

पुणे, पुढारी वृत्‍तसेवा : देश, देव, धर्म ही आपल्या जीवनातील अविभाज्य अंग आहेत. या तिन्हींचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना प्रत्येक भारतीयांनी हा सण आनंदाचा समजून साजरा केला पाहिजे, असे प्रतिपादन  डॉ. सुशील महाराज यांनी जैन श्रावक संघ आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.

घरोघरी तिरंगा ही वेगळी संकल्पना देशात प्रथमच राबविली आहे. १५ ऑगस्ट हा शासकिय सण न होता तो घराघरात पोहोचला पाहिजे. हा आनंद प्रत्येक भारतीयाला निश्चित अभिमानास्पद आहे. राष्ट्राभिमान निर्मितीसाठी अशा उपक्रमांची अत्यंत गरज आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी लाखो स्वातंत्र्यवीरांना आपल्या रक्ताचा अभिषेक या मातृभूमीसाठी करावा लागला या क्रांतिकारकांच्या रक्ताने माखलेल्या या मातृभूमीची माती तिलक म्हणून कपाळी लावली पाहिजे. हा टिळा आपला स्वाभिमान आहे! आपल्या देशात विविध धर्माचे लोक गुनगोविंदाने नांदत आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावे हीच आपली संस्कृती आहे व या भारतीय संस्कृतीचा जगात आदर्श आहे. आपली संस्कृती आपला अभिमान आहे व आपण या संस्कृतीच्या एक धागा आहोत, असे ते म्‍हणाले.

त्यागातून मिळालेल्या या स्वातंत्र्याचा आनंद प्रत्येक भारतीयांनी घेतला पाहिजे. हा देश पुन्हा पारतंत्र्यात वा परकीय आक्रमणात जाणार नाही, कर्जाच्या आर्थिक बोजात दबून जाणार नाही यासाठी आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे! प्रत्येक भारतीयाने क्षणिक सुखापेक्षा आपल्या व आपल्या भावी पिढीचा विचार केला पाहिजे. एवढ्याने काय होते हा आत्मघातकी विचार सोडून दिला पाहिजे. उदाहरण म्हणून पाण्याच्या एका धारेपासून समुद्र निर्माण होतो.

तपमूर्ती स्नेहलता धाकड यांच्या 19 उपवास व शालिनी धाकड यांच्या 33 एकासना तपस्या निमित्त श्री संघातर्फे अनुमोदना देऊन शासन देवीच्या चरणी तपस्या सुखसातपूर्वक संपन्न व्हावी अशी प्रार्थना करण्यात आली. भारत मातेचा वेश परिधान करून. तन्वी शाळ या चिमुकलीने स्वातंत्र्य देवीचे मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्ष राजेंद्र चोरडिया यांनी केले. त्यास ऋषी जैन यांनी सहकार्य केले. याप्रसंगी श्री जैन श्रावक संघाचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, सागर साखला कचरदास गांधी, सुभाषमामा चुत्तर, मदन भाऊ कर्नावट, खुशाल बोरा, पोपटलाल बाफना, मदनला चोरडिया, सुरेश सोळंकी, राहुल गुंदेचा, मनोज गांधी, अमृतलाल गुंदेचा, अशोक बोरा, अशोक कुमार चोपडा, अरुण पारख, रवींद्र मुथियान विजय पारख आदी उपस्थित होते.

Back to top button