पिंपरी : शहर झाले तिरंगामय | पुढारी

पिंपरी : शहर झाले तिरंगामय

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे. शहरातील नागरिकांनी या आवाहनास प्रतिसाद देत घरांवर, सोसायट्यांमध्ये तिरंगा लावून या अभियानात सहभाग दर्शविला आहे.

यंदा 13 ते 15 ऑगस्टदरम्यान सर्वांनी तिरंगी झेंडा घरावर लावायचा आहे. त्यामुळे आजपासून सर्व शहर तिरंगामय दिसू लागले आहे. शहरातील वस्त्यांमध्ये, घरावर, कार्यालये, शोरुम्स इतकेच नाहीतर छोट्या टपर्‍या, वाहने, पेट्रोलपंप याठिकाणी तिरंगा लावण्यात आलेला आहे. शहरात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी सुरू आहे. नागरिकांना सलग सुट्यांमुळे खरेदीचा अवधीदेखील मिळाला आहे. आज दिवसभर नागरिकांची झेंडा लावण्यासाठी चाललेली धडपड दिसून आली.

तिरंगी झेंडा हा देशाची शान व अभिमान असल्याने त्याचे पावित्र्य जपणे हे सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. सायंकाळ होण्यापूर्वी घराघरांवर झेंडे लावण्यात आले होते. शहरातील सर्व शासकीय कार्यालये, राजकीय पक्षांची कार्यालये, संस्था याठिकाणी स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरू आहे.

Back to top button