पुणे : ऊस तज्ज्ञ डॉ. डी. जी. हापसे यांचे निधन - पुढारी

पुणे : ऊस तज्ज्ञ डॉ. डी. जी. हापसे यांचे निधन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रसिद्ध ऊस तज्ज्ञ डॉ. डी.जी. हापसे (वय ८३) यांचे शनिवारी सायंकाळी (दि.२८) पुणे येथील राहत्या घरी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने साखर उद्योगात दुःख व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी, तीन विवाहित कन्या असा परिवार आहे.

ऊस तज्ज्ञ डॉ. डी.जी. हापसे यांचे अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे हे त्यांचे मुळगाव होते. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्गत निफाड येथील गहू संशोधन केंद्रात गहू संशोधक म्हणून त्यांनी सुरुवातीला काम पाहिले.

त्यानंतर पाडेगाव येथे ऊस तज्ञ म्हणून काम केले. विद्यापीठातून स्वेच्छा निवृत्ती घेऊन त्यांनी मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) येथे संचालक म्हणून दहा वर्षे काम पाहिले.

त्यानंतर स्वतःच्या ज्ञानशील प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना किफायतशीर ऊस शेती आणि उसाची हेक्टरी उत्पादकता वाढीसाठी शेवटपर्यंत मार्गदर्शन केले.

त्यांनी केंद्र सरकारच्या कोईमतूर येथील ऊस प्रजनन संस्था, लखनौ येथील ऊस संशोधन संस्थेवर सल्लागार म्हणून काम पाहिले.

डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनसह ते विविध संस्थांवर त्यांनी प्रमुख शास्त्रज्ञ, मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यातील अनेक साखर कारखान्यांचे ऊस शेती सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

पुणे विद्यापीठाचे माजी उप कुलगुरू डॉ मोहनराव हापसे यांचे ते बंधू तर व्हीएसआयचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे यांचे ते चुलते होत.

Back to top button