बारामतीतील बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक, जेजुरीतील दांपत्याविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

बारामतीतील बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक, जेजुरीतील दांपत्याविरोधात गुन्हा दाखल

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामतीतील बांधकाम व्यावसायिकाची १९ लाख ९८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जेजुरी (ता. पुरंदर) येथील दांपत्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज गुजर आणि श्रद्धा पंकज गुजर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. बारामतीतील बांधकाम व्यावसायिक मनोज लक्ष्मण पोतेकर यांनी याबाबत फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार ३० सप्टेंबर २०२१ ते ३१ जुलै २०२२ या कालावधीत हा गुन्हा घडला. फिर्यादी हे ट्रायो बिल्टकान प्रा. लि. कंपनीचे संचालक आहेत. त्यांचे मुख्य कार्यालय शहरातील देसाई इस्टेट भागात आहे.

१४ जून २०१८ रोजी त्यांच्या कंपनीमध्ये मे. रजनी हेल्थ केअर प्रोडक्टचे प्रोप्रायटर श्रद्धा गुजर यांच्यामध्ये जेजुरी एमआयडीसीतील प्लाॅट नंबर ई १८-१ मध्ये बांधकाम करण्याबाबत ३ कोटी ५० लाख रुपयांचा करार झाला. त्या करारावर रजनी हेल्थ केअरतर्फे श्रद्धा गुजर यांनी स्वाक्षरी केली. करारात नमूद केल्याप्रमाणे फिर्यादीने बांधकाम करून दिले. त्यांना बांधकामासाठी सुमारे ३ कोटी १८ लाख व जीएसटी रक्कम सुमारे ५७ लाख अशी ३ कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम गुजर यांच्याकडून येणे बाकी होती. त्यातील काही रक्कम गुजर यांनी दिली. ९ जुलै २०२१ रोजी सुमारे ४८ लाख २३ हजारांची रक्कम येणे असल्याचे कळविण्यात आले होते.

त्यानंतर १५ लाख ७५ हजार रुपये गुजर यांनी चेकद्वारे जमा केले. उर्वरित रकमेसाठी वारंवार मागणी केली असता आज देतो, उद्या देतो अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. ३० सप्टेंबर २०२१ रोजी त्यांनी २५ लाख रुपयांचा बॅंक आॅफ महाराष्ट्रचा धनादेश दिला. परंतु तो भरू नका, आम्ही तुम्हाला रक्कम देवू असे गुजर यांनी सांगितले. त्यामुळे फिर्य़ादीने वाट पाहिली. पैसे मिळत नसल्याने मुदतीच्या अखेरच्या दिवशी तो बॅंकेत भरला. तो न वटता परत आला.

त्यानंतर फिर्यादीने पुन्हा पैशाची मागणी केली असता पंकज गुजर यांनी आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही काय करायचे ते करा, असे उत्तर दिले. पैशाबाबत वारंवार विनंती केल्यानंतर दरमहा २ लाख ५० हजार रुपयांप्रमाणे १२ लाख ५० हजार रुपये पाच महिन्यात देण्यात आले. उर्वरित १९ लाख ९८ हजार रुपये दिले नाहीत. त्याबाबत पुन्हा फोन केला असता तुमची गाडी जेजुरीमध्ये अडवून तुम्हाला आमचा हिसका दाखवू, तुम्ही पैसे विचरून जा, आमची लांबपर्यत ओळख आहे, परत पैशासाठी फोन करू नका असे सांगण्यात आले. शिवाय श्रद्धा यांनी करारावर मी सही मी सही केलेली नसून पंकज गुजर यांनी सही केली असल्याचे सांगितले असल्याचे म्हटले आहे.

Back to top button