पुणे : ब्लूटूथच्या मदतीने चोरट्याला बेड्या | पुढारी

पुणे : ब्लूटूथच्या मदतीने चोरट्याला बेड्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा: एका सराईत चोरट्याकडून चतुःशृंगी पोलिसांनी सात चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. कानातील ब्लूटूथच्या साह्याने चोरीच्या गुन्ह्याच्या छडा लावून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. विवेक वाल्मिक गायकवाड (वय 20, रा. गुजरनगर थेरगाव, मूळ. बेटजवळगा, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) असे त्याचे नाव आहे. नवीन गाड्या वापरण्याचा छंद असल्याच्या कारणातून तो दुचाकींची चोरी करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहन चोरीच्या गुन्ह्यात मोठी वाढ होताना दिसून येते आहे. त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक महेश भोसले, कर्मचारी प्रकाश आव्हाड़, तेजेस चोपडे, ज्ञानेश्वर मुळे, किशोर दुशिंग औंध येथील डी मार्ट परिसरात सापळा लावून चोरट्याची वाट पाहत होते. त्यावेळी एक व्यक्ती दुचाकींना चाव्या लावून पाहत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी संशयित तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने डी मार्ट शेजारील पार्किंगमधून एक दुचाकी चोरी केल्याचे सांगितले.

त्यानुसार त्याच्याकडून इतरदेखील गुन्ह्याचा छडा लावून दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गायकवाड याला दुचाकी फिरवण्याचा छंद आहे. चोरी केलेल्या दुचाकीतून पेट्रोल काढून घेतल्यानंतर त्या दुचाकी तो एका ठिकाणी लपवून ठेवत असे. असा अडकला जाळ्यात दुचाकी चोरी गेल्याच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, एक तरुण विविध ठिकाणी पार्क केलेल्या गाड्यांना चावी लावून पाहताना पोलिसांना दिसले होते. प्रत्येक वेळी त्याच्या कानात ब्लूटूथ होता. त्यानुसार पोलिसांनी इतर ठिकाणचे फुटेज तपासले असता, तोच तरुण त्यांना दिसून आला. दरम्यान डी मार्ट शेजारील पार्किंगमध्ये सापळा लावून थांबल्यानंतर ब्लूटूथ कानात असलेला एक संशयित गाड्यांना चाव्या लावून पाहताना त्यांना दिसून आला. त्यानुसार त्याला पकडले.

Back to top button