पुणे : अकरावीचा कटऑफ कमी होईना; दुसर्‍या फेरीतही 90 टक्क्यांच्या पुढेच | पुढारी

पुणे : अकरावीचा कटऑफ कमी होईना; दुसर्‍या फेरीतही 90 टक्क्यांच्या पुढेच

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत नामांकित महाविद्यालयांतील पात्रता गुण (कटऑफ) दुसर्‍या फेरीतही कमी झालेले नाहीत. दुसर्‍या फेरीतही नामांकित महाविद्यालयांचे कटऑफ 90 टक्क्यांच्या पुढेच आहेत. त्यामुळे दुसर्‍या फेरीतही नामांकित महाविद्यालयांचे प्रवेश विद्यार्थ्यांना दुरापास्तच असल्याचे दिसते आहे. केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतील दुसर्‍या फेरीची गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली.

त्यात बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात 94.60 टक्के, फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेसाठी 96.20 टक्के, स. प. महाविद्यालयात विज्ञान शाखेत 91.40 टक्के, कला शाखेसाठी 93 टक्के, सिम्बायोसिस महाविद्यालयात कला शाखेसाठी 94 टक्के, वाणिज्य शाखेसाठी 91.60 टक्के, शामराव कलमाडी महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी 93 टक्के, मॉडर्न महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी 90.60 टक्के, आबासाहेब गरवारे महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी 88.40 टक्के गुण आवश्यक आहेत.

गेल्या वर्षी दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे निकालाचा टक्का वाढल्याने अकरावीचे पात्रता गुण वाढले होते. तर यंदा दहावीची प्रत्यक्ष परीक्षा झाल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत निकाल काही प्रमाणात कमी झाला. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशाच्या पात्रता गुणांमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. मात्र तरीदेखील दुसर्‍या फेरीतही बहुतांशी महाविद्यालयांचा कटऑफ नव्वदीपारच असल्याचे दिसत आहे.

मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव म्हणाले, ‘कटऑफ फारसे कमी होत नाहीत हा नेहमीचा अनुभव आहे. कारण जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी खूप असतात. तसेच 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण असणार्‍या विद्यार्थ्यांना माहीत असते की कोणत्या ना कोणत्या फेरीत आपल्याला नामांकित महाविद्यालयामध्येच प्रवेश मिळेल. प्रवेशप्रक्रियेतील पारदर्शकतेमुळे आणि सर्वाधिक गुण असणार्‍या विद्यार्थ्यांमुळे कटऑफवर फारसा परिणाम होत नसल्याचे दिसून येते.’

Back to top button