पुणे आरटीओ’त मुन्नाभाई; डॉक्टरांऐवजी एजंटच देतात 50 रुपयांत सर्टिफिकेट | पुढारी

पुणे आरटीओ’त मुन्नाभाई; डॉक्टरांऐवजी एजंटच देतात 50 रुपयांत सर्टिफिकेट

पुणे; पुढारी वृत्तसेवा: परवाना नूतनीकरणासाठी असलेले मेडिकल सर्टिफिकेट डॉक्टरांऐवजी एजंटच 50 रुपयांत विनातपासणी देत असल्याचे पाहणीदरम्यान समोर आले आहे. या वेळी पुन्हा परवाना देताना संबंधित व्यक्ती फिट आहे की अनफिट, हे देखील व्यवस्थितरीत्या पाहिले जात नाही. त्यामुळे रस्त्यांवर अपघात वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

‘आरटीओ’तील परवान्यासंदर्भात आवश्यक असलेल्या मेडिकल (वैद्यकीय) प्रमाणपत्राचे कामकाज कशाप्रकारे चालते आणि शासनाकडून नव्याने अमलात आणलेल्या प्रक्रियेची अंमलबजावणी होते की नाही, याची दै. ‘पुढारी’कडून शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या वेळी पुणे आरटीओच्या आवारात डॉक्टरांऐवजी एजंटच 50 रुपये घेऊन मेडिकल सर्टिफिकेट देत असल्याचे पाहणीदरम्यान समोर आले. त्यामुळे आरटीओच्या कामकाजाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

प्रमाणपत्राबाबतची नवी नियमावली
परवाना नूतनीकरण करणार्‍या ज्येष्ठ व्यक्तीला आपण फिट असल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच मेडिकल सर्टिफिकेट ऑनलाइन अपलोड करणे बंधनकारक आहे. हे मेडिकल सर्टिफिकेट एमबीबीएस डॉक्टरचे असावे, असेही यात बंधनकारक आहे. त्यानुसार, एमबीबीएस डॉक्टरांनी आपली पदवी आणि स्वत:ची कागदपत्रे, रुग्णालयाचे छायाचित्र याद्वारे स्वत:ची आरटीओ कार्यालयात नोंदणी करावी. त्यानंतरच डॉक्टरांना मेडिकल सर्टिफिकेट देण्याचे अधिकार आहेत. अशा आतापर्यंत 17 वैध डॉक्टरांची आरटीओत नोंद
झाली आहे.

असा झाला संवाद…
प्रतिनिधी : आमच्या काकांचे लायसन्स रिन्यू करून हवे आहे.
एजंट : ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल.
प्रतिनिधी : ऑनलाइन फॉर्म भरला आहे, फक्त मेडिकल सर्टिफिकेट
हवे आहे.
एजंट : ठीक आहे. 50 रुपये लागतील, कागदपत्रे घेऊन या.
प्रतिनिधी : पण डॉक्टर कुठे आहेत?
एजंट : कागदपत्रे आणा, आम्ही देतो.

बोगस वैद्यकीय प्रमाणपत्राचेे ‘आरटीओ’त असे होते वाटप
‘आरटीओ’ परिसरात काही एजंटांनी एमबीबीएस डॉक्टरांशी संपर्क करून त्यांचा शिक्का मागविला आहे. परवाना नूतनीकरणासाठी कोणी आले की त्या व्यक्तीकडून 50 रुपये घेऊन हे एजंटच शिक्का मारून मेडिकल सर्टिफिकेट देतात आणि स्वत:च डॉक्टरांची बोगस सही करतात. या वेळी संबंधित कोणत्याही व्यकीची मेडिकल, फिटनेस तपासणी होत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे अशा प्रकारे चुकीची कामे करणार्‍या डॉक्टरांच्या शिक्क्यांची तपासणी करून संबंधित डॉक्टरचा परवाना रद्द करावा, अशी मागणी होत आहे.

एजंटच वैद्यकीय प्रमाणपत्र देतात, याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही आणि आम्हाला याची कोणीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे लगेचच येथे पाहणी करून कारवाई करू.
                              – संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

 

Back to top button