…तर मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढा उभारावा लागेल : संभाजीराजे | पुढारी

...तर मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढा उभारावा लागेल : संभाजीराजे

पुणे : पुढारी वृत्तसेवा मराठा समाजाला आरक्षण दिलेले देवेंद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री आहेत, तर उपोषण सोडताना आश्‍वासन देणारे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांना सगळी माहिती असून ते मराठा समाजाचे आहेत. तरीही आरक्षण मिळाले नाही तर पुन्हा एकदा लढा उभारावा लागेल, असा इशारा माजी खासदार संभाजीराजे यांनी दिला आहे.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर आणि संभाजीराजे यांची शुक्रवारी पुण्यात भेट झाली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. नवनिर्वाचित मंत्री केसरकर यांना पर्यटन खाते मिळावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्‍त केली. रायगडासोबतच महाराष्ट्र पर्यटन देशभरात पोहोचण्याची गरज आहे. त्यांच्यामार्फत महाराष्ट्र देशभरात पोहोचेल, अशी अपेक्षाही त्यांंनी व्यक्‍त केली.

मराठा समाजाला मूलभूत सुविधा द्याव्यात. या समाजाला सामाजिक मागास ठरवण्यासाठी आयोग गठीत करावा, त्यासाठी तातडीने बैठक बोलवावी आणि समाजाचे प्रश्‍न सोडवावेत. या बैठकीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही आमंत्रित करण्यात यावे, असे सांगून ‘मराठा आरक्षणाची संपूर्ण प्रक्रिया पुन्हा करावी लागणार आहे,’ असेही ते म्हणाले. केसरकर म्हणाले, महाराष्ट्राचे वैभव जगासमोर आले पाहिजे. कोल्हापूर आणि जयपूरमध्ये काहीच फरक नाही. कोल्हापूरमध्ये इतिहास जपला पाहिजे. दोन्ही महाराजांना भेटलो. त्यामुळे आनंद वाटला.

Back to top button