‘शिवाजी महाराजांच्या नावानं शिवसेना पक्ष स्थापन केला, मग मी म्हणू का पक्ष माझा’! | पुढारी

‘शिवाजी महाराजांच्या नावानं शिवसेना पक्ष स्थापन केला, मग मी म्हणू का पक्ष माझा’!

पुणे, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना ठाकरेंची की शिंदे गटाची? असा प्रश्न विचारला असता उदयनराजे यांनी, संपूर्ण महाराष्ट्र माझा आहे. शिवसेना शिवरायांच्या नावाने सुरू झाली, मग ती माझी आहे असे मी म्हणू का? असा प्रतिप्रश्न करीत उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

‘प्रत्येकालाच सत्ता हवी असते, पण आत्मचिंतन केले असते, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, असा टोलाही त्यांनी लगावला. आता जे एकत्र आले आहेत ते कायमस्वरूपी एकत्र राहतील, असे दिसते. जेव्हा लोक विचाराने एकत्र येतात, तेव्हा त्याना एकत्र ठेवण्यासाठी कोणतीही ताकद वापरावी लागत नाही, असेही ते म्हणाले.

खासदार उदयन राजे भोसले यांनी मंत्री दीपक केसरकर यांची पुण्यात भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना त्यांनी उत्तरे दिली. राज्यातील पर्यटन स्थळांचा विकास व्हावा, महाबळेश्वरमध्ये आणखी कोणती विकासकामे करता येतील याबाबत चर्चा केल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.

मराठा आरक्षणावर नुसतेच पाट्या लावून फिरतात. देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणासाठी प्रयत्न केले. त्यांनाच जातीयवादी म्हणतात. मी जातपात बघत नाही. शिवाजी महाराजांनी जातपात पाहिली नाही, मग मी कसा पाहीन? असेही उदयनराजे म्हणाले.

Back to top button