उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग | पुढारी

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा :  पुणे, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यासह मराठवाड्यालाही वरदान ठरलेले उजनी धरण गुरुवारी (दि. 11) 98 .01 टक्के भरले. उजनीची वाटचाल शंभर टक्क्याकडे सुरू असताना गुरुवारी धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले. त्यातून एकूण दहा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वीज निर्मिती केंद्रासाठी ही पाणी सोडण्यात आले असून वीज निर्मिती केंद्र सुरू झाले आहे.

धरण पूर्णक्षमतेने भरण्याची शक्यता असल्याने धरणाच्या 42 पैकी आठ मोर्‍यांतून सुरुवातीला पाच हजार क्युसेकने व रात्री आठ वाजता सोळा मोर्‍यातून दहा हजार क्युसेकने पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. सध्या उजनीत 116. 17 टीएमसी पाणीसाठा आहे. पुण्यातील 19 धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग उजनी जलाशयात येत आहे. दौंड मधून येणार्‍या विसर्गात वाढ होत असून 41 हजार 827 क्युसेक तर बंडगार्डनहून 19519 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. उजनी धरणाने संथ गतीने का होईना 98 टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांबरोबरच उद्योगधंदे, कारखानदार व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान, वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

उजनी धरणाची पाणीपातळी खालीलप्रमाणे
एकूण पाणीपातळी – 496 .740 मी.
एकूण पाणीसाठा – 116 .17 टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा – 52 .51 टीएमसी
टक्केवारी – 98.01 %
दौंड विसर्ग – 41827 क्युसेक
बंडगार्डन विसर्ग – 19519 क्युसेक
सिना माढा बोगदा – 259 क्युसेक
दहीगाव उपसा सिंचन – 43 क्युसेक
मुख्य कालवा – 1500 क्युसेक
विजनिर्मिती – 1600 क्युसेक
बोगदा – 800 क्युसेक

Back to top button