रक्षाबंधनामुळे बारामतीत उच्चांकी गर्दी | पुढारी

रक्षाबंधनामुळे बारामतीत उच्चांकी गर्दी

बारामती : पुढारी वृत्तसेवा : रक्षाबंधन, गुरुवारचा आठवडे बाजार, शाळा आणि शासकीय कार्यालयांना सुट्यांमुळे बारामती शहरात गुरुवारी (दि.11) रस्त्यांवर उच्चांकी गर्दी पहायला मिळाली. शहरातील मुख्य चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून रक्षाबंधन सणाला मर्यादा होत्या, मात्र यावर्षी बारामती शहर आणि तालुक्यात महिलांनी उत्साहात रक्षाबंधन साजरे केले.

ऐनसणासुदीला नेहमीप्रमाणेच शहरात बारामतीसह जिल्ह्याच्या विविध भागातून येणार्‍या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सलग दोन दिवस बारामती शहरात मुसळधार पाऊस झाला होता. गुरुवारी पावसाने विश्रांती घेतल्याने बारामतीकर खरेदीसाठी बाहेर पडले. परगावावरून हजारो चारचाकी वाहने शहरात आल्यानेही गर्दीत वाढ झाली. बारामती शहर पोलिसांनी गर्दी नियंत्रणासाठी प्रयत्न केले, मात्र वाहनांची संख्या जास्त असल्याने दिवसभर गर्दी वाढतच गेली.

राखीची दुकाने ठिकठिकाणी लागल्याने तसेच गुरुवारचा बाजार, अस्ताव्यस्त वाहने, वाढलेली अतिक्रमणे यामुळे शहरातील वाहतूक कोंडीतून बारामतीकरांची सुटका होत नाही.

Back to top button