पुणे : बदलीसाठी चुकीची माहिती भरणार्‍या शिक्षकांवर होणार कारवाई | पुढारी

पुणे : बदलीसाठी चुकीची माहिती भरणार्‍या शिक्षकांवर होणार कारवाई

पुणे, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या 2022 मधील आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन सुरू आहेत. या प्रक्रियेत माहिती भरताना शिक्षकांनी जाणीवपूर्वक चुकीची माहिती भरल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. यामध्ये एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले आहेत.

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत शासनाचे वेळापत्रकानुसार काम सुरू आहे. शनिवारी (दि.13) शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी 2 व 3 ऑगस्ट या दोन दिवसांमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांची बिंदुनामावली (रोस्टर) अपलोड करण्यात आली. 6 ते 8 ऑगस्ट हे चार दिवस शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करण्यास मुदत होती.

दरम्यान, काही शिक्षकांकडून संबंधित संवर्गाची पात्रता धारण करीत नसतानाही जाणीवपूर्वक खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज भरल्याच्या तक्रारी आल्या असल्याचे शासनाच्या आदेशात नुमूद आहे. अशा खोट्या व चुकीच्या माहितीच्या आधारे अर्ज भरल्यास व त्याआधारे शिक्षकांच्या बदल्या झाल्या, तर संबंधित संवर्गाची पात्रता धारण करणार्‍या खर्‍या पात्र शिक्षकांवर अन्याय होत असल्याचे शासनाने म्हटले आहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये ना-हरकत प्रमाणपत्रधारक शिक्षक आणि विशेष संवर्ग एक शिक्षक या संवर्गात अर्ज सादर केलेल्या सर्व शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या शिक्षकांनी जाणीवपूर्वक खोट्या व चुकीच्या प्रमाणपत्र आधारे अर्ज भरल्याचे सिद्ध होईल, त्यांचा अर्ज ऑनलाईन प्रणालीतील संबंधित संवर्गातून बाद करण्यात येणार आहे. संबंधित शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, आता बदल्यासंदर्भात ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज सादर करण्याची मुदत संपली असल्यामुळे अशा शिक्षकास नव्याने अर्ज भरण्याची मुभा असणार नसल्याचे ही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Back to top button