वेल्हे : पानशेत शंभर टक्के, वरसगाव भरण्याच्या मार्गावर | पुढारी

वेल्हे : पानशेत शंभर टक्के, वरसगाव भरण्याच्या मार्गावर

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : पानशेत धरण खोर्‍यात गुरुवारी (दि. 11) पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सकाळी सहा वाजता पानशेत (नरवीर तानाजी सागर) धरण शंभर टक्के भरून वाहू लागले. त्यामुळे टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात आली. सकाळी सव्वादहा वाजल्यापासून 18 हजार 784 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने पानशेतच्या सांडव्यावरील बाजारपेठ पुलावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. दुर्घटना घडू नये, यासाठी वेल्हे पोलिसांनी पूल व धरण परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे.

यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच पानशेतमधून विसर्ग सुरू झाल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनी पानशेतच्या पुलावर तसेच वांजळवाडी सांडव्यावर गर्दी केली होती. स्थानिक कार्यकर्ते वसंत चर्‍हेकर, विजय निवंगुणे आदीं नागरिकांना सूचना देत होते.
पानशेत पाठोपाठ वरसगाव (वीर बाजी पासलकर जलाशय) धरणही शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. पानशेतमधून सोडण्यात येणार्‍या पाण्यामुळे खडकवासला धरणही भरून वाहू लागले. त्यामुळे खडकवासलातून मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले. दुपारी दोन वाजता खडकवासलातून 9416 क्युसेकने पाणी सोडले जात होते.

वेल्हे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश कदम म्हणाले, ‘पानशेत धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. पानशेत परिसरात येणार्‍या पर्यटकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा. खबरदारीसाठी मुख्य रस्त्यावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.’
खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता योगेश भंडलकर म्हणाले, ‘पानशेत शंभर टक्के भरल्याने जादा पाणी सोडले जात आहे. वरसगावही शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे. खडकवासलात पाण्याची आवक वाढल्याने मुठा नदीच्या पात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.’

Back to top button