पुणे : रक्षाबंधनाला बहरले बहीण-भावाचे बंध; घराघरांत सण, सोशल मीडियावर संदेश | पुढारी

पुणे : रक्षाबंधनाला बहरले बहीण-भावाचे बंध; घराघरांत सण, सोशल मीडियावर संदेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोणी परगावी असणार्‍या भावाशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत, तर कोणी बहिणीबद्दल सोशल मीडियावर खास संदेश लिहीत… कोणी भावाची प्रत्यक्ष भेट घेऊन, तर कोणी फेसबुकवर खास व्हिडिओ पोस्ट करून बहिणीविषयीच्या भावनांना मोकळी वाट देत…अनोखा रक्षाबंधन साजरा केला. यंदाही एकेमकांपासून दूर असणार्‍या भावा-बहिणींनी डिजिटल पद्धतीने रक्षाबंधन साजरा करत एकमेकांबद्दलचे प्रेम द्विगुणित केले. परदेशी राहणार्‍या भावाने व्हिडिओ कॉलद्वारे बहिणीशी संवाद साधला, तर काही बहिणींनी फेसबुक अन् इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित भावाबद्दलच्या प्रेमाला वाट करून दिली.

रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्यातील अनोखे बंध अधिक मजबूत करणारा दिवस…दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाचा आनंदोत्सव घराघरांमध्ये रंगला होता. यंदा ज्या बहीण-भाऊ एकमेकांना भेटू शकले नाहीत, त्यांनी सोशल मीडियाद्वारे एकमेकांबद्दलच्या भावनांना मोकळी वाट करून दिली. फेसबुक, इन्स्टाग्राम वॉल रक्षाबंधनाच्या छायाचित्रांनी भरून देले. याशिवाय घराघरांमध्येही रक्षाबंधनाचे चैतन्य पाहायला मिळाले. सकाळी बहिणीने भावाला ओवाळले अन् त्याला भेटवस्तूही दिली, तर बहिणीच्या या प्रेमाला भावानेही बहिणीला भेटवस्तू देऊन प्रेमाचे बंध जोडले.

यानिमित्ताने घराघरांमध्ये पंचपक्वानांचा बेतही आखण्यात आला. सहकुटुंब प्रत्येकाने पंचक्वानांचा आस्वाद घेतला. याशिवाय काहींनी फिरायला जाण्याचे, तर काहींनी चित्रपट पाहण्याचे निमित्त साधले, तर काहींनी कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्यास प्राधान्य दिले. रेशीम धाग्याची राखी भावाच्या हातावर बांधत, त्याला ओवाळत बहिणींनी त्यांच्याबद्दलचे प्रेम व्यक्त केले. काही संस्था-संघटनांच्या वतीने या दिवशी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. वृक्षांसोबत आगळे-वेगळे रक्षाबंधन साजरा करण्यासह विविध उपक्रम आयोजिले होते.

भेटवस्तूंची खरेदी
ऐनवेळी काहींनी बाजारपेठेत राख्यांची आणि भेटवस्तूंची खरेदी केली. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन, रविवार पेठ, कॅम्प आदी ठिकाणी खरेदीसाठी महिला-युवती आल्या होत्या. राख्यांसह बहिणींनी भावासाठी भेटवस्तूही घेतले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने विविध मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. मंदिरांमध्ये यानिमित्ताने खास फुलांची सजावटही करण्यात आली होती. अभिषेक, पूजा आणि आरतीत भाविकांनी सहभाग घेतला.

Back to top button