पुणे : फसवणूक करणार्‍या तोतया कर्नलला बेड्या; नोकरीच्या आमिषाने उकळले लाखो रुपये | पुढारी

पुणे : फसवणूक करणार्‍या तोतया कर्नलला बेड्या; नोकरीच्या आमिषाने उकळले लाखो रुपये

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कर्नल असल्याची बतावणी करीत पठाणकोट येथे सैन्य दलात नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणांना लाखोंचा गंडा घालणार्‍याला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली. संजय रघुनाथ सावंत (रा. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पंजाबमधील पठाणकोट शहरात 2021 मध्ये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपीबाबत आर्मी इंटेलिजन्सकडून मिळालेल्या माहितीनूसार गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने पुण्यातून ही कारवाई केली.

सावंत हा देहूरोड परिसरातील आर्मीच्या डीओडी डेपोमध्ये ट्रेडमन म्हणून नोकरीला होता. दोन वर्षांपूर्वी तो सेवानिवृत्त झाला. त्यानंतर त्याने इतर काही साथीदारांसोबत मिळून विद्यार्थ्यांची फसवणूक केली. पठाणकोट येथे आर्मीमध्ये नोकरीला लावतो, असे सांगून चार ते पाच विद्यार्थी, तसेच काही पालकांकडून सुमारे 23 ते 25 लाख रुपये उकळले. यानंतर तो फरार झाला. याबाबत पठाणकोटमध्ये गुन्हा दाखल असून, दोन आरोपींना यापूर्वी ताब्यात घेण्यात आले आहे. तर, सावंत याचा शोध सुरू होता. सावंत हा पुण्यातील रहिवासी असल्याने आर्मी इंटेलिजन्सकडून पुणे पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली होती.

त्यानुसार गुन्हे शाखा यूनिट चार आणि मिलिट्री इंटेलिजन्स यांचे संयुक्त पथक सावंत याचा शोध घेत होते. युनिट चारचे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विकास जाधव, हवालदार राजस शेख, प्रवीण भालचिम, संजय आढारी यांचे पथक सावंत याच्या मागावर होते. या दरम्यान सावंत हा सध्या पिंपळे गुरव येथे राहत असून, तेथेच रिक्षा चालविण्याचे काम करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली.

त्यानुसार सलग आठ दिवस पिंपळे गुरव परिसरातील 150 ते दोनशे रिक्षांची तपासणी करून पथकाने स्थानिक मिलिट्री इंटेलिजन्सचे अंमलदार यांच्यासह एकत्रितरीत्या कारवाई करून सावंत याला ताब्यात घेतले. सावंत याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. गुन्ह्याचा तपास पठाणकोट पोलीस करीत असल्याने योग्य ती कार्यवाही करून सावंत याला पठाणकोट पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.

Back to top button