पुणे : मिळकतीचे वाटप आता आयुक्तांच्या अधिकारात | पुढारी

पुणे : मिळकतीचे वाटप आता आयुक्तांच्या अधिकारात

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या व्यायामशाळा, अभ्यासिका, समाजमंदिर आदी मिळकतीचे वितरण करताना क्षेत्रीय कार्यालयांना बंधने घालण्यात आली आहेत. पंधराशे चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या मिळकतींसह आता पंधराशे चौरस फुटांच्या आतीलही मिळकतींचे वाटप आयुक्तांच्या अधिकारात आणण्यात येणार आहे. महापालिकेच्या मालकीचे समाजमंदिर, विरंगुळा केंद्र आदी इमारतींमधील 1500 चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळ असणार्‍या मिळकती किंवा इमारतीचा ताबा भवन विभाग, मालमत्ता विभागाकडून संबंधित विभागाकडे हस्तांतरित केला जातो.

मात्र, पंधराशे चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळ असणार्‍या मिळकती आणि इमारतींचा ताबा संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे असतो. अशा किती इमारती आहेत, त्यांचा काय वापर सुरू आहे, याची माहिती प्रशासनाने संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडून मागविली होती. क्षेत्रीय कार्यालयांच्या ताब्यात 438 इमारती असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली होती. या मिळकतींचा सद्यःस्थितीत काय वापर केला जात आहे. याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. मात्र, ते अद्याप पूर्ण झालेले नाहीत.

1500 चौरस फुटांपेक्षा मोठ्या मिळकतींच्या वाटपाचे अधिकार महापालिका आयुक्तांच्या कक्षेत आणण्यात आले आहेत. तर, त्या आतील मिळकतीचे वितरण करण्याचे अधिकार क्षेत्रीय कार्यालयाच्या नियंत्रणात आहेत. मात्र, आता 1500 चौरस फुटांपेक्षा कमी असलेल्या मिळकतीही आयुक्तांच्या अधिकार कक्षेत आणण्याच्या दृष्टीने मालमत्ता व्यवस्थापन विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत.

Back to top button