लवकरच बाणेर वाहतूक विभाग; जागेची चाचपणी करण्यास पोलिसांकडून सुरुवात | पुढारी

लवकरच बाणेर वाहतूक विभाग; जागेची चाचपणी करण्यास पोलिसांकडून सुरुवात

पुणे; पुढारी वृत्तसेवा: चतुःशृंगी वाहतूक विभागाचे विभाजन करून लवकरच बाणेर हा नवीन वाहतूक विभाग कार्यान्वित केला जाणार आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, विभागासाठी जागेची पाहणीदेखील करण्यात आली आहे. शहरात सध्या 27 वाहतूक विभाग कार्यरत आहेत. बाणेर वाहतूक विभाग सुरू झाल्यानंतर त्यांची सख्या 28 होईल. विद्यापीठ चौकातील मेट्रोचा उड्डाणपूल, तसेच बाणेर रस्त्यावरील मेट्रोचे काम यामुळे या परिसरातील वाहतुकीचे नियमन करताना चतुःशृंगी वाहतूक विभागावर मोठा ताण पडतो. उपलब्ध मनुष्यबळात काम करताना येथील कर्मचारी व अधिकार्‍यांना मोठी कसरत करावी लागते.

परिणामी, परिसरात वाहतूक कोंडीदेखील होत आहे. त्यामुळे बाणेर या नवीन वाहतूक विभागाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विद्यापीठ चौकातून पिंपरी-चिंचवड, बाणेर, पाषाण, तसेच मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाकडे जाणार्‍या वाहनांची नेहमी गर्दी असते. व्हीआयपींचीदेखील नेहमी रहदारी असते. राजभवनही याच परिसरात आहे. त्यामुळे राजकीय व्यक्तींचे येथे नेहमी जाणे-येणे असते.

त्यामुळे येथील वाहतूक कोंडीवर वाहतूक पोलिसांना नेहमीच लक्ष ठेवून राहावे लागते. रात्री उशिरापर्यंत येथे पोलिसांना वाहतूक नियमन करावे लागते. मेट्रोचे काम पुढील दोन वर्षे चालू राहणार आहे. विद्यापीठ चौकातील पुलाचे कामदेखील मोठे आहे. सध्या या कामाला सुरुवात झाली असून, मेट्रो मार्गिकेचे खांब उभारण्यात येत आहेत. यामुळे रस्त्यांची रुंदी कमी झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते आहे.

वाहतूक कोंडी सुटण्यास मदत
विद्यापीठ चौकातील कामामुळे तेथे स्वतंत्र पोलिस अधिकारी लागतात. त्यामुळे बाणेर वाहतूक विभाग लवकरात लवकर अस्तित्वात आला, तर दोन्ही विभागांचे मिळून या परिसरात जास्त मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे येथील परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असून, कर्मचार्‍यांवरील ताणदेखील कमी होणार आहे. वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी नव्याने होणार्‍या बाणेर वाहतूक विभागासाठी जागेची पाहणी केली असून, लवकरात लवकर हा विभाग कार्यान्वित होणार असल्याचे सांगितले आहे..

Back to top button