अखेर पुणे महापालिकेला ‘कोव्हिशिल्ड’ मिळाले; आज लसीकरण सुरू | पुढारी

अखेर पुणे महापालिकेला ‘कोव्हिशिल्ड’ मिळाले; आज लसीकरण सुरू

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आठवडाभरापासून महापालिकेस राज्य सरकारकडून कोव्हिशिल्ड लसींचा पुरवठा झाला नव्हता. त्यामुळे केवळ सहा केंद्रांवर लसी उपलब्ध करून देण्यात येत होत्या. बुधवारी महापालिकेला राज्य सरकारकडून 30 हजार कोव्हिशिल्ड लसी मिळाल्याने 11 जुलै रोजी लसीकरण सुरू राहणार आरहे. महापालिकेकडे सध्या 30 हजार कोव्हिशिल्ड, 11 हजार 200 कॉर्बेव्हॅक्स आणि 13 हजार कोव्हॅक्सिन लसींचा साठा उपलब्ध आहे.

कोव्हिशिल्ड लसीचा गेल्या दोन आठवड्यांपासून शहरात तुटवडा जाणवत होता. त्यामुळे केवळ 6 केंद्रांवर प्रत्येकी 100 किंवा 200 डोस उपलब्ध करून दिले जात होते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 15 जुलैपासून 18 वर्षांपुढील नागरिकांना मोफत बूस्टर डोस उपलब्ध करून दिल्याने लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ लागली. मात्र, केंद्र व राज्य सरकारचे लस खरेदीचे नियोजन चुकल्याने लस उपलब्ध होत नसल्याचे चित्र दिसून येत होते. महापालिकेकडून वारंवार राज्याकडे लसींची मागणी करण्यात येत होती. मंगळवारी लशी मिळाल्याचे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.

बुधवारी राखी पौर्णिमेनिमित्त महापालिकेला सुटी असली तरी मुरलीधर लायगुडे दवाखाना, कमला नेहरू रुग्णालय, राजीव गांधी रुग्णालय, जयाबाई सुतार दवाखाना, अण्णासाहेब मगर रुग्णालय आणि शिवशंकर पोटे दवाखाना या सहा लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी 100 कोर्बेव्हॅक्स, 100 कोव्हॅक्सिन आणि 200 कोव्हिशिल्ड लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Back to top button