आता पुणेकर वैतागले, आधीच खड्डे; त्यात पाणी साचल्याने मार्ग काढताना कसरत | पुढारी

आता पुणेकर वैतागले, आधीच खड्डे; त्यात पाणी साचल्याने मार्ग काढताना कसरत

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरात बुधवारी (दि. 10) दुपारनंतर कोसळलेल्या रिमझिम पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. रस्त्यावर आधीच खड्ड्यांची गर्दी. त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालक व पादचार्‍यांना मार्ग काढताना कसरत करावी लागली.
पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या पावसातच पालिका प्रशासनाच्या कामाचा दर्जा उघडकीस आला. त्यानंतर प्रशासनाने खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली. मात्र, कालांतराने ती थंडावली. परिणामी, शहरात अजूनही काही ठिकाणी खड्डे असल्याचे पाहायला मिळत आहेत. याच खड्ड्यांमध्ये बुधवारी कोसळलेल्या पावसामुळे तळी साचली होती. त्यातून वाट काढताना वाहनचालकांच्या नाकीनऊ आले.

मुख्य रस्त्यांवर पाणीच पाणी..
मध्यवस्तीसह उपनगरांतील गल्लीबोळांमध्ये बुधवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. तसेच, शहरातील प्रसिद्ध अशा रस्त्यांवरील उंच भागामध्ये सुध्दा पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. शंकरशेठ रस्ता, एसटी मुख्यालयाजवळ, सातारा रस्त्यावर, शास्त्री रस्त्यावर, गांजवे चौक परिसरात, अलका टॉकीज चौक परिसर, फर्ग्युसन रस्ता, लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, अप्पर रस्ता, कात्रज परिसर येथे देखील पाणी साचले होते.

Back to top button