पीक कर्ज प्रकरणे मंजुरीसाठी १२ ऑगस्टला विशेष शिबीरे घ्या: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख | पुढारी

पीक कर्ज प्रकरणे मंजुरीसाठी १२ ऑगस्टला विशेष शिबीरे घ्या: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : पीक कर्ज वितरण, प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) आणि कृषी पायाभूत सुविधा निधी (ॲग्री इन्फ्रा फंड-एआयएफ) प्रकल्प प्रस्तावांना गती देण्यासाठी येत्या १२ ऑगस्ट रोजी विशेष शिबीरे जिल्ह्यातील सर्व बँकांच्या शाखांमध्ये आयोजित करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

एसएलबीसी सदस्य बँकांच्या पुणे जिल्ह्यातील विभागीय आणि प्रादेशिक व्यवस्थापकांची विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हा अग्रणी बँक तथा महाराष्ट्र बँकेचे पुणे शहर क्षेत्रीय महाव्यवस्थापक राजेश सिंग, पुणे पूर्व क्षेत्रीय व्यवस्थापक अभिजित चंदा तसेच अन्य सदस्य बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रादेशिक व्यवस्थापक आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा अग्रणी बँकेने सर्व बँकामध्ये प्रलंबित असलेल्या पीक कर्ज वाटप प्रस्तावांची तसेच पीएमएफएमई, एआयएफ अंतर्गतच्या प्रस्तावांचा आढावा सादर केला. या सर्व प्रस्तावांची छाननी करुन येत्या १२ तारखेच्या शिबीरामध्ये सर्व पात्र प्रस्तावांना त्वरीत मंजुरी द्यावी. या कामामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि अधिनस्त कार्यालयांनी विशेष सहभाग घ्यावा. तसेच शिबीरानंतर त्वरीत याबाबतचा आढावा सादर करावा, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या.

Back to top button