पुणे : खामगळवाडी गावाकडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था | पुढारी

पुणे : खामगळवाडी गावाकडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था

माळेगाव, पुढारी वृत्तसेवा : खामगळवाडी (ता. बारामती) येथील गावाकडे जाणार्‍या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. अपघातांच्या घटना घडण्याची शक्यता आहे.

निरा – बारामती रस्त्याला जोडल्या जाणार्‍या खामगळवाडी गावाकडे जाणार्‍या रस्त्याचे डांबरीकरण उखडले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. बहुतांशी ठिकाणी रस्ता उखडला गेला असून खडी वर आली आहे. त्यामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचे काम नुकतेच केले होते, मात्र ठेकेदाराने कामाचा दर्जा राखला नसल्याने रस्त्यांची दुरवस्था झाल्याची तक्रार नागरिक करत आहेत.

रस्त्यावर सातत्याने वाहनांची वर्दळ असते. शेतकर्‍यांची तरकारी वाहतूक, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ ये- जा करत असतात. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाल्याने त्यांना त्रासदायक ठरत आहे. रस्त्याचे काम त्वरित करण्याची मागणी गणेश मारुती खामगळ, संदीप खांमगळ, देवीदास खामगळ, स्वप्निल खामगळ, रोशन खामगळ आदींनी केली आहे.

Back to top button