पुणे : परंपरा जपण्यासाठी आदिवासींनी एकत्र यावे | पुढारी

पुणे : परंपरा जपण्यासाठी आदिवासींनी एकत्र यावे

जुन्नर, पुढारी वृत्तसेवा : आदिवासी समाजाने आपली संस्कृती, रूढी, परंपरा जपण्यासाठी एकत्रित येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार अतुल बेनके यांनी केले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त जुन्नर येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. जागतिक आदिवासी दिनाची राज्य सरकारने सुटी जाहीर करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील हजारो बांधवांनी यावेळी हजेरी लावली. मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते क्रांतिवीर बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मिठाई वाटली. याप्रसंगी वक्तृत्व स्पर्धा, आदिवासी नृत्य स्पर्धा, वारली पेंटिंग स्पर्धा आदींचे आयोजन केले होते. दरम्यान यावेळी आयोजित मिरवणुकीत ढोल-लेझीम पथकांसह आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून मिरवणुकीला सुरुवात झाली. पावसाच्या सरी झेलत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. रवींद्र तळपे, काळू शेळकंदे, मारुती वायाळ, मधुकर काठे, भाऊ देवाडे, दत्ता गवारी, देवराम लांडे आदी उपस्थित होते.

Back to top button